महापौरपदाची संधी हुकली, स्थायी समितीचे अध्यक्षपद पटकावलं,… यशवंत जाधव यांची बाजी !
मुंबई : महापालिकेच्या तिजोरीची चावी समजली जाणाऱ्या स्थायी समिती अध्यक्षपदी सभागृहनेते यशवंत जाधव, शिक्षण समिती अध्यक्षपदी मंगेश सातमकर आणि सुधार समिती अध्यक्षपदी दिलीप लांडे यांनी आज मुंबई महापालिका चिटणीस प्रकाश जेकटे यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केले. मात्र एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने तिघांचीही निवड बिनविरोध झालीय. केवळ अधिकृत घोषणेची औपचरिकता उरलीय. महापौर पदाच्या निवडणुकीसाठी यशवंत जाधव हे इच्छुक होते. मात्र महापौर पदाची त्यांची संधी हुकली होती. त्यामुळे जाधव यांना सभागृह नेतेपद देण्यात आलं होत. आता मात्र महापालिकेच्या तिजोरीची चावी पटकवण्यात त्यांनी बाजी मारलीय.
स्थायी व शिक्षण समितीची निवडणूक ५ एप्रिलला तर सुधार समितीची निवडणूक ६ एप्रिल रोजी होणार आहे. स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर आणि शिक्षण समिती अध्यक्ष शुभदा गुडेकर यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने ही निवडणूक होत आहे. स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली होती मात्र सभागृह नेते यशवंत जाधव यांनाच उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे आता सभागृह नेतेपदासाठी रस्सीखेच सुरू झालीय.
दिलीप लांडेना बक्षिसी
मनसेतील ५ नगरसेवकांसह शिवसेनेत दाखल झालेले दिलीप लांडे यांना शिवसेनेने सुधार समिती अध्यक्षपदाची बक्षिसी दिलीय.