दलित साहित्याचे अभ्यासक व ज्येष्ठ विचारवंत डॉ. गंगाधर पानतावणे यांचे निधन
औरंगाबाद :  दलित साहित्याचे अभ्यासक, एक विचारवंत लेखक आणि पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गंगाधर विठोबाजी पानतावणे यांचे मंगळवारी निधन झाले आहे.  ते ८१ वर्षाचे होते. केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित केेलेे  होते.
दलित साहित्याचा त्यांचा सखोल अभ्यास होता. त्यामुळे त्यांनी केलेले बरेचसे लेखन हे दलित साहित्याच्या अनुषंगाने असेच आहे. दलित साहित्य आणि दलित चळवळीत त्यांचे मोलाचे योगदान होते.   `धम्मचर्चा` `मूल्यवेध` , मुकनायक, विदोहाचे पाणी पेटले आहे, वादळाचे वंशज, दलित वैचारिक वाड्गमय, किल्ले पन्हाळा ते किल्ले् विशाळगड, साहित्य, प्रकृती आणि प्रवृत्ती, साहित्य शोध आणि संवाद हे सर्व ग्रंथ वैचारिक आणि समीक्षात्मक असे आहे. पानतावणे यांनी लोकसाहित्य, कविता, नाटक, समीक्षा आणि संशोधनपर लेखन केले. दलित साहित्य अकादमी, फाय फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची गौरव वृत्ती आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
एक संपादक- लेखक
डॉ. गंगाधर पानतावणे यांनी 2009 साली अमेरिकेतील सान होजे येथे झालेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. अस्तितादर्श` या नियतकालिकाच्या संपादकपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारीही त्यांनी घेतली होती. तसेच दलित आत्मकथा, दलित साहित्य, चर्चा आणि चिंतन, लोकरंग, स्त्री आत्मकथन, महारांचा सांस्कृतिक इतिहास हे त्यांनी संपादन केलेले काही ग्रंथ. चळवळीला वैचारिक अधिष्ठान देणारे नियतकालिका म्हणून अस्मितादर्शकडे पाहिले जाते.  गेल्या अनेक दिवसांपासून ते आजाराशी झूंज देत होते. अखेर मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
 
* अल्प परिचय * : 
गंगाधर विठोबाजी पानतावणे हे मूळचे विदर्भातले. 28 जून 1937 साली नागपूर येथे त्यांचा जन्म झाला. डी.सी. मिशन स्कूल येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. तर नवयुग विद्यालय आणि पटवर्धन हायस्कूल नागपूर येथे माध्यमिक शिक्षण झाले. 1956 साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नागपूर महाविद्यालयातून त्यांनी बी. ए. आणि एम. ए. ची पदवी मिळवली. मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी पी. एच. डी. ची पदवीही मिळवली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं.
**

आंबेडकरी चळवळीचा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला : देवेंद्र फडणवीस

प्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळ आणि साहित्याला वैचारिकतेचे अधिष्ठान देणारा एक ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला आहे, अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण केली .

मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, व्यासंगी प्राध्यापक, कृतीशील विचारवंत आणि परखड समीक्षक म्हणून एक स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या डॉ. पानतावणे यांनी वंचित-उपेक्षितांच्या प्रबोधनासह सक्षमीकरणासाठी दिलेले योगदान ‘अस्मितादर्श’क म्हणून समाजाला सतत मार्गदर्शन करीत राहील. विशेषतः साहित्यिकांच्या नव्या पिढीला अभिव्यक्तीसाठी माध्यम उपलब्ध करुन देण्यासह तिच्या वैचारिक जडणघडणीतही त्यांचे मोलाचे योगदान होते.

लेखणीला कृतीशीलतेची जोड दिलेल्या विचारवंतास आपण मुकलो… हरिभाऊ बागडे 

प्रसिध्द साहित्यिक, विचारवंत, समीक्षक आणि आंबेडकरी चळवळीचे मार्गदर्शक प्रा.डॉ.गंगाधर पानतावणे यांच्या निधनामुळे आपण लेखणीला कृतीशीलतेची जोड दिलेल्या विचारवंतास मुकलो आहोत, अशा शब्दात विधानसभेचे अध्यक्ष  हरिभाऊ बागडे यांनी आपली शोकसंवेदना व्यक्त केली. नागपुरात जन्मलेले प्रा.डॉ.पानतावणे औरंगाबादमध्ये स्थायिक झाले. ‘अस्मितादर्श’ नियतकालिकाला त्यांच्या संपादनामुळे एका चळवळीचे स्वरुप प्राप्त झाले. त्यांनी अनेकविध लेखनप्रकार हाताळले, मात्र त्याचा गाभा तेजस्वी आंबेडकरी विचार हाच होता. दिवंगत राज्यपाल, विधानपरिषदेचे माजी सभापती .रा.सू.गवई यांचा स्मृतीग्रंथ ‘अजातशत्रू’ विधानमंडळातील वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राने प्रकाशित केला. या ग्रंथास त्यांची प्रस्तावना लाभली आहे. प्रा.डॉ.पानतावणे यांना माझी भावपूर्ण आदरांजली असे बागडे यांनी शोकसंवेदनेत म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *