नो हाँकींग, रस्ते सुरक्षेबाबत जनजागृतीसाठी मुंबईत उद्या २० -२० क्रिकेट सामना

मुंबई : ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी वाहन चालविताना ‘हॉर्न वाजवू नका’ हा संदेश देण्यासाठी तसेच रस्ता सुरक्षेचा संदेश देण्यासाठी मुंबईत उद्या शनिवारी (दि. २४ मार्च) भारतीय क्रिकेट संघातील खेळाडुंच्या विशेष २० -२० मॅचचे आयोजन करण्यात आले आहे. हा सामना वानखेडे स्टेडीयम येथे सायंकाळी ७ वाजता होईल. क्रिकेट सामन्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिवहन मंत्री दिवाकर रावते, क्रिकेटपटू सुनिल गावसकर, परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

*‘हॉर्न नॉट ओके प्लिज’ अभियान*

वातावरणातील बहुतांश ध्वनी प्रदुषण हे वाहनांच्या ध्वनीमुळे होते आणि त्यातील साधारण ७० टक्के ध्वनी प्रदूषण हे वाहनचालकांनी विनाकारण हॉर्न वाजविल्यामुळे होते, असे विविध अभ्यासातून पुढे आले आहे. या ध्वनी प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. हे रोखण्यासाठी परिवहन विभागामार्फत मागील काही महिन्यांपासून ‘हॉर्न नॉट ओके प्लिज’ अभियान राबविले जात आहे. तसेच रस्ते अपघात रोखण्यासाठी रस्ते सुरक्षा जनजागृती अभियान राबविले जात आहे. या दोन्ही मोहीमांविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याच्या उद्देशाने या विशेष २० – २० क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य शासनाचा परिवहन विभाग, मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि टाटा ग्रुप यांच्यामार्फत हा सामना आयोजित करण्यात आला आहे. ‘नो हाँकींग ११’ विरुद्ध ‘रोड सेफ्टी ११’ या दोन क्रिकेट संघांमध्ये हा सामना होणार आहे.

‘नो हाँकींग ११’ संघात के. एल. राहूल, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, युवराज सिंह, दिनेश कार्तिक, आर्यमन विक्रम बिर्ला, कृणाल पंड्या, हरभजन सिंग, जसप्रित बुमराह, शिवम मावी, शार्दुल ठाकूर या खेळाडूंचा समावेश आहे.  ‘रोड सेफ्टी ११’ संघात इशन किशन, शिखर धवन, सुरेश रैना, मनोज तिवारी, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, अभिशेक नायर, युजवेंद्र चहल, कमलेश नागरकोटी, विनय कुमार, प्रविण तांबे या खेळाडुंचा समावेश आहे.

०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!