औरंगाबादप्रमाणे कल्याणच्या कचऱ्याचा प्रश्न सोडवा : आमदार शिंदे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी,
मुख्यमंत्र्यांनी दिले प्रधान सचिवांना निर्देश
कल्याण : गेल्या सहा दिवसांपासून कल्याणच्या डम्पिंग ग्राऊंडला लागलेली आग धुमसत असून, त्याच्या धुराचा प्रचंड त्रास कल्याणकराना सोसावा लागत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार जगन्नाथ( आप्पा) शिंदे यांनी आज विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. औरंगाबादप्रमाणे कल्याणच्या कचऱ्याचा प्रश्न सोडवा अशी मागणी आमदार शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. कचऱ्याच्या समस्येवर कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रधान सचिवांना निर्देश दिले आहेत अशी माहिती आमदार शिंदे यांनी दिली.
आधारवाडी डम्पिंगची कचरा साठवण्याची क्षमता संपल्याने मुंबई उच्च न्यायालयाने हे डम्पिंग बंद करून पालिकेच्या आरक्षित जागेवर शास्रोक्त पद्धतीने साकारण्यात पालिका असफल ठरलीय. आर्थिक दृष्टया पालिका तितकी सक्षम नाही. औरंगाबाद मधील कचऱ्याचा प्रश्न सोडविताना भरीव आर्थिक मदत करून तेथील जनतेला न्याय मिळवून दिला त्याच प्रमाणे कल्याणकरानाही अशीच मदत अपेक्षित आहे याकडं शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधलं. केडीएमसीच्या डम्पिंग ग्राउंड शास्त्रोक्त पद्धतीने कार्यन्वित होण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. यावेळी मुख्तामंत्र्यांनी शासन स्तरावर योग्य ती कार्यवाही सुरू असल्याचे सांगून तसे प्रधान सचिवांना निर्देश दिले.