राज्यातील सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी
महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प : – राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील

मुंबई : राज्यात सायबर गुन्हांना आळा घालण्यासाठी शासनाने विशेष पावले उचलली असून, राज्यात यासाठी महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प राबविण्यात येत आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक, सायबर, मुंबई यांच्या अधिपत्याखाली स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात आली असल्याची माहिती गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.

डॉ. पाटील म्हणाले, राज्यात सायबर सुरक्षेसाठी ६५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय. केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्र सर्ट (CERT) सुरु करण्यात येत आहे. यासाठी विशेष सायबर मुख्यालय उभारण्यात येणार आहे. ४७ सायबर लॅब उघडण्यात आल्या आहेत. तसेच ४३ सायबर पोलीस स्टेशन्स उभारण्यात येत असून त्यापैकी ३२ कार्यान्वित देखील झाली आहेत. सायबर सुरक्षेसाठी १३३ लोकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. गुगल व्हॉट्सअप, फेसबूक यासारख्या समाज माध्यमांवरून अफवा पसरविणाऱ्या घटनांचे विश्लेषण करण्यात येणार आहे. न्यायाधिशांसाठी असलेल्या प्रशिक्षण संस्थेच्या धर्तीवर सायबर सुरक्षेसाठी प्रशिक्षण यंत्रणा राबविण्यात येणार आहे. सायबर गुन्ह्यांबाबत दोषसिद्धतेचा दर वाढावा यासाठी सरकारी वकिलांनाही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सायबर सुरक्षा या विषयाचे गांभीर्य आणि महत्व लक्षात घेता यासंदर्भात एक तासाची चर्चा घेण्यात यावी असे निर्देश यावेळी सभापतींनी दिले. वरील विषयाच्या अनुषंगाने सदस्य सतेज उर्फ बंटी पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात हा प्रश्न उपस्थित केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *