कच-यापासून उर्जा निर्मितीचा प्रकल्प मार्गी लागणार – आयुक्त पी .वेलरासू
पालिकेच्या निविदेला मोठा प्रतिसाद
कल्याण : घनकच-यापासून विदयुत निर्मितीचा प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहे, असे महापालिका आयुक्त पी.वेलरासू यांनी सांगितले. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मौजे उंबर्डे, कल्याण पश्चिम येथे घनकच-यापासून उर्जा निर्मिती प्रक्रिया प्रकल्प राबविण्यासाठी महापालिकेने निविदा सूचना प्रसिध्द केलीय. या निविदेस मोठया प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. या प्रकल्पाची निविदापूर्व बैठक आज आयुक्त पी.वेलरासू यांच्या दालनात झाली. याबैठकीत ट्रान्सपरेंट टीकेएनएम मलेशिया, जिंदाल अर्बन इन्फ्र लि., इंडिया पॉवर लि.,खागा एनर्जी,ग्रिन लॉजीक्स, स्टेफिल नेक्लॅंड लि., बायोक्लिन सिस्टीम, डेक्क्न माईन, इन्फीनिटी या कंपनीचे अभिकर्ते उपस्थित होते. यांनी या प्रकल्पाबाबत आपले स्वारस्य दाखविले असून, त्यांनी उपस्थित केलेल्या शंकाचे निरसन आयुक्त पी.वेलरासू यांनी यावेळी केले. यानंतर प्रत्यक्ष घटनास्थळांची पाहणी करण्यात आली.
दररोज निर्माण होणा-या 500 मे.ट. घनकचरा प्रकल्पापासून उर्जा निर्मिती होणार असून, हा प्रकल्प ‘बांधा वापरा आणि हस्तांतरित करा ‘ या तत्वावर उभारण्याचा महापालिकेचा मानस आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज ही महाराष्ट्र राज्य वीज नियामक मंडळ यांच्या मान्यतेने विज वितरण कंपनीस घ्यावयाचे आहे. सदर प्रकल्पासाठी सदयस्थितीत कल्याण डोंबिवली महापालिका कोणतेही अर्थसहाय देत नसल्याने, वीज खरेदीसाठीचा किमान हमी भाव रु.5.50 प्रति KWh इतकी हमी महापालिकेने स्विकारली आहे. यावर आधारित इच्छूक अभिकर्त्यानी प्रति मे.ट. टिपिंग फी देखील नमुद करावयाची आहे. आजच्या बैठकीस पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत, जल अभियंता चंद्रकांत कोलते व प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता घनशाम नवांगुळ उपस्थित होते.