मला जीवे ठार मारण्याचा कट : रिपाइं जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांचा आरोप, रिपाइंच्या शिष्टमंडळाने घेतली एसीपींची भेट
डोंबिवली : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे कल्याण डोंबिवली शहर जिल्हाअध्यक्ष प्रल्हाद जाधव यांच्यावर केलेल्या हल्ल्यातील आरोपींना तातडीने अटक करावी या मागणीसाठी रिपाइंच्या शिष्टमंडळाने डोंबिवलीचे एसीपी रविंद्र वाडेकर यांची भेट घेतली. मला जीवे ठार मारण्याचाच कट रचण्यात आला होता अशी माहिती जिल्हाध्यक्ष जाधव यांनी दिलीय. या शिष्टमंडळात डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड, कल्याण जिल्हा सचिव रमेश बर्वे, रामा कांबळे, विकास गायकवाड, रिपाइंचे युवक जिल्हाध्यक्ष जय जाधव, डोंबिवली युवक अध्यक्ष सतीश पवार, वसंत टेकाळे, तुकाराम पवार, समाधान तायडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ९ मार्चला हाणामारीचा प्रकार घडला हेाता. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झालाय. त्या व्हिडीओमध्ये मला मारण्याचा प्रयत्न सुरू असून सदर आरोपी स्पष्टपणे दिसत आहेत त्यामुळे त्या आधारे त्यांना अटक करावी अशी मागणी पोलिसांकडे केल्याचे जाधव यांनी सांगितले. जाधव यांनी सांगितले की, गेल्या २६ वर्षापासून मी राजकारणात सक्रीय आहे. ३ वर्षे उपतालुका अध्यक्ष, ५ वर्षे डोंबिवली शहर अध्यक्ष त्यानंतर १८ वर्षे जिल्हाध्यक्ष पदावर काम करीत आहेत. पक्षाचे काम चोखपणे बजावत असल्यानेच इतकी वर्षे जिल्हाध्यक्ष म्हणून पदावर कार्यरत आहे. मात्र पक्षात फूट पाडून रिपाइं पक्ष संपविण्यासाठीच अनेकजण काम करीत आहेत. त्या दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहात बेकायदेशीरपणे सभा घेण्यात आली होती. त्यातील अनेकजण हे पक्षाचे कार्यकर्तेही नाहीत. तसेच जिल्हाध्यक्ष निवडण्याचा सर्वस्वी अधिकार हा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना आहे. तसेच यांच्याविषयीही या सभेत अपमानास्पद वक्तव्य करण्यात आले. मात्र त्या दिवशीचा हल्ला म्हणजे मला जीवे ठार मारण्याचा नियोजित कट रचण्यात आल्याचे या प्रकारावरून दिसून आला. यापूर्वीही ऑनलाइनच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष पदासाठी बेकायदेशीरपणे मतदान घेण्यात आले होते. त्यावेळीही पोलिसांकडे तक्रार करण्यात आलीय असेही जाधव यांनी सांगितलं. महापालिका क्षेत्रात एकूण ७२ झोपडपटया आहेत. झोपडपट्टयांमध्ये शासनाच्या विविध योजना पेाहचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कल्याण डोंबिवलीत पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून मला सर्वत्र फिरावे लागते. या हल्ल्यानंतर माझया जीवाला धोका निर्माण झालाय. त्यामुळे मला नि:शुल्क पोलीस संरक्षण मिळावे अशीही मागणी पोलिसांकडे करण्यात आल्याचे जाधव यांनी सांगितले.