वीजभारनियमनाचे  संकट १५ दिवसाचे  : दिवाळीत भारनियमन नाही :
ऊर्जामंत्री बावनकुळे यांची माहिती
नागपूर : ऐन दिवाळीत वीजभारनियमन होणार असल्याने सरकारविरोधात जनतेत तीव्र संतापाची लाट पसरली होती. अखेर दिवाळीत भारनियमन होणार नाही अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे पत्रकार परिषदेत दिली. महानिर्मिती व खाजगी वीज निर्मिती कंपन्यांची वीज निर्मिती कमी झाल्यामुळे भारनियमनाचे तात्पुरते संकट निर्माण निर्माण झाले असून, येत्या १५ दिवसात विजेची परिस्थिती सुधारेल असा विश्वास ऊर्जामंत्रयानी व्यक्त केला.
ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले की, एससीसीएल कोळसा खाणीत पडलेल्या पावसामुळे कोळसा उत्पादनावर परिणाम झाला. परिणामी कमी कोळसा उपलब्ध झाल्यामुळे भारनियमन करावे लागत असून नागरिकांनी सध्या ऊर्जा बचतीचा प्रयत्न करून शासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. मुंबईची विजेची मागणी पूर्ण करण्यात येत असून मुंबईत भारनियमन होणार नाही. तसेच महानगरांमध्येही भारनियमन होणार नाही. टाटा पॉवरकडून सध्या ८५० मेगावॉट, जलविद्युतद्वारे ४१० मेगावॉट, डहाणूकडून २४० मेगावॉट, व्हीआयपीएल ३१० मेगावॉट, लघुकालिन निविदा व एक्स्चेंजच्या माध्यमातून १५३० मेगावॉट वीज मिळत आहे. महानिर्मितीकडून औष्णिक व वायू प्रकल्पातून ४९८० मेगावॉट, कोयना जलविद्युत प्रक़ल्पातून १३६० मेगावॉट, केंद्रीय प्रकल्पातून 4100 मेगावॉट वीज मिळत आहे. खुल्या बाजारातही वीज उपलब्ध नाही.
२००० मेगावॅटची तूट
अदानीकडून १७५० मेगावट, रतन इंडियाकडून ३८० मेगावॉट, सीजीपीएलकडून ५६० मेगावॉट व सौर, पवनऊर्जा, एमको, जिंदाल यांच्याकडून २०० मेगावॉट वीज मिळत आहे. सध्या अंदाजे २००० मेगावॉटची तूट निर्माण झाली आहे. तूर्तास पवनऊर्जा, अणुऊर्जा व जलविद्युत प्रकल्प बंद आहेत. त्यामुळेच वीज तुटवड्याचे संकट निर्माण झाले आहे. ही स्थिती १५ दिवसात सुधारणार आहे. त्यामुळे सध्याचे भारनियमन हे तात्पुरत्या स्वरूपातील आहे. विजेची मागणी असताना विजेचा तुटवडा पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी राज्याची मागणी पूर्ण करून उत्तरप्रदेशला वीज दिली आहे. तसेच ३० मार्च २०१७ ला सुमारे २४ हजार मेगावॉट विजेचे यशस्वी वितरण आणि पारेषण केले आहे, याकडेही ऊर्जामंत्र्यांनी लक्ष वेधले. याप्रसंगी आ. मल्लिकार्जुन रेड्डी, महावितरणचे नागपूरचे मुख्य अभियंता शेख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *