सिंधुताईंनी अनाथांना सन्मानाने जगण्याची दिशा दिली -राष्ट्रपती
डॉ.सिंधुताई सपकाळ व उर्मिला आपटे यांना ‘नारी शक्ती’ पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली : सिंधुताईंनी अनाथांना आसरा देत त्यांना सन्माने जगण्याची दिशा दिली , अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याचा गौरव केला. राष्ट्रपतींच्या हस्ते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, अनाथांची माता डॉ. सिंधुताई सपकाळ व महिलांना आत्मनिर्भर बनविण्यात मोलाचे योगदान देणा-या उर्मिला आपटे यांना उल्लेखनीय कार्यासाठी आज ‘नारी शक्ती’ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
राष्ट्रपती पुढे म्हणाले की, आजच्या या पुरस्कार सोहळयात देशात विविध क्षेत्रात कार्य करणा-या महिलांच्या कार्याचा गौरव झाला. पुरस्कार स्वीकारणा-यांमधे महाराष्ट्रातील अनाथांच्या माई सिंधुताई यांचे कार्य मनाला भिडले. लग्नानंतर घराबाहेर काढल्याने स्वत: अनाथपणाचे चटके सोसणारी सिंधुताई पुढे अनाथांची माई झाली. त्यांनी आतापर्यंत १४०० अनाथ मुला- मुलींचा सांभाळ केला व त्यांना सन्मानाने जगण्याची दिशा दिली. सिंधुमाईंचे हे कार्य देशातील महिलांसाठी प्रेरणादायी असून हे कार्य पुढे नेण्याची जबाबदारीही महिलांवर असल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी, केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्यावतीने जागतिक महिला दिना निमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित शानदार कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते वर्ष २०१७ चे राष्ट्रीय ‘नारी शक्ती पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी, केंद्रीय महिला व बालकल्याण राज्यमंत्री डॉ विरेंद्र कुमार आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या देशातील ३० महिला व ९ संस्थांना यावेळी सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सिंधुताई सपकाळ व उर्मिला आपटे यांना यावेळी गौरविण्यात आले .
स्वत: अनाथपणाचे चटके सोसल्याने इतर अनाथांची परवड थांबविण्यासाठी त्यांची माई म्हणून अथक कार्य करणा-या सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याची दखल या पुरस्कारासाठी घेण्यात आली. मुळच्या वर्धा येथील माई सिंधुताई यांना चौथ्या वर्गापासूनच शिक्षण अर्धवट सोडावे लागले. १० व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. नंतर लहानग्या मुलीसह त्यांना घराबाहेर काढले याकाळात त्यांनी अनाथपणाचे चटके सोसले व याचवेळी अनाथांच्या सेवेसाठी कार्य करण्याचा त्यांनी निर्धार केला. संघर्षाने परिस्थितीवर मात करणा-या सिंधुताईंनी कष्टाच्या कमाईतून अनाथ मुला-मुलींच्या संगोपणास सुरुवात केली. आज या कार्याचा विस्तार होऊन महाराष्ट्रात ५ अनाथाश्रम उभे राहिले आहेत. अनाथ मुला-मुलींसोबत या अनाथाश्रमात कुटुंबाने टाकून दिलेल्या महिलांनाही आश्रय दिला जातो. अनाथाश्रमातील मुला- मुलींत व महिलांमध्ये स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे सामर्थ्य निर्माण केले जाते. या अनाथाश्रमातील मुले -मुली शिक्षक, डॉक्टर, इंजिनीअर, वकील अशा विविध पदांवर कार्यरत असून समाजाची सेवा करीत आहेत. अनाथांना आश्रय देणा-या सिंधुताईंनी राज्यातील ८४ आदिवासी गावांच्या पुनर्वसनासाठी महत्वाचे कार्य केले. माईंच्या जीवनावर चित्रपटही तयार झाला त्यांना आतापर्यंत ७५० हून अधिक विविध पुरस्कार मिळाले आहेत. डी.वाय.पाटील विद्यापिठाने सिंधुताईंच्या कार्याचा गौरव करत डीलीट पदवी प्रदान केली.
भारतीय स्त्री शक्ती संस्थेची १९८८ मध्ये स्थापना करून स्त्रियांच्या विकासासाठी अविश्रांत कार्यकरणा-या मुंबई येथील उर्मिला आपटे यांच्या कार्याचाही आजच्या पुरस्काराने गौरव करण्यात आला. उर्मिला आपटे यांनी समाजात स्त्री -पुरुष समानता निर्माण करण्याचे ध्येय डोळयासमोर ठेवून कार्य आरंभले. विविध क्षेत्रात महिलांसोबत होणा-या भेदभावाचा त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून सखोल अभ्यास केला व हा भेदभाव नष्ट करण्यासाठी वैविद्यपूर्ण कार्य केले. संस्थेच्या माध्यमातून विविध आयोजन करून त्यांनी कुटुंब आणि देश घडविण्यात महिलांच्या महत्वपूर्ण भूमिकेबाबत समाजाचे प्रबोधन केले. या संस्थेच्या माध्यमातून उर्मिला आपटे यांनी स्त्रियांना शिक्षित केले व त्यांचा कौशल्य विकास केला. स्त्रियांना आर्थिकदृष्टया स्वावलंबी बनवून त्यांना आत्मनिर्भर करण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या याच कार्याची दखल ‘नारी शक्ती’ राष्ट्रीय पुरस्कारासाठी घेण्यात आली.