कागदात वडापाव, भजी बांधून देण्यावर बंदी येणार ?
मुंबईकरांच्या पोटाला आधार असणारा वडापाव कागदामध्ये बांधून देणं काही नवीन नाही. मात्र लवकरच कागदात वडापाव, भजी असे पदार्थ बांधून देण्यावर बंदी येण्याची शक्यता आहे. असे खाद्यपदार्थ अनेकदा जुन्या रद्दीतील वर्तमानपत्रांमध्ये बांधून दिले जातात. त्या वर्तमानपत्रांवरील शाई आरोग्यासाठी धोकादायक असल्याने ही पद्धत बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. लवकरच हा कागद बंदीचा निर्णय मुंबई महानगरपालिकेत महासभेमध्ये चर्चेसाठी आणला जाणार आहे.
मुंबईत अनेक खाऊ गल्ल्या आहेत तसेच कॉर्पोरेट ऑफीसेस, लोकप्रिय पर्यटन स्थळांच्या आजूबाजूला अनेक गाड्यांवर वडापाव, पॅटीस, भजी, समोरे, पुरी भाजी असे पदार्थ मिळतात. अनेकदा गाड्यांवरूनच या पदार्थांची विक्री करण्यात येत असल्याने स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जात नाही. ‘फास्टफूड’ प्रकारात मोडणारे हे तळलेले पदार्थ विक्रेते सर्रास वृत्तपत्रांमध्ये बांधून देण्यात येतात. पदार्थ गरम असताना त्यातील तेलामुळे या वृत्तपत्रांवरील शाई खाद्यपदार्थांना लागते. वृत्तपत्रांवर छापण्यात येणाऱ्या मजकुरासाठी वापरल्या जाणाऱ्या शाईत ‘ग्राफाइट’ नावाचा अत्यंत विषारी घटक असतो. तो या पदार्थांमार्फत लाखो मुंबईकरांचा पोटात जातो. ‘ग्राफाइट’मुळे कर्करोग होण्याची शक्यता बळावते. त्यामुळेच अशाप्रकारे कागदांमध्ये खाद्यपदार्थ बांधून देण्याच्या पद्धतीवर त्वरीत बंदी आणावी अशी मागणी शिवसेनेचे वरळीतील विभागप्रमुख आणि नगरसेवक आशिष चेंबूरकर यांनी केली आहे. रोगांच्या प्रसारास प्रतिबंध आणि आळा घालण्यासाठी उपाययोजना करणे हे मुंबई महापालिकेचे आवश्यक आणि बंधनकारक कर्तव्य असल्याचे महापालिकेच्या अधिनियमातील तरतुदींमध्ये नमूद करण्यात आल्याचे चेंबूरकर यांनी महापालिकेला सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *