डॉ. सिंधुताई सपकाळ व उर्मिला आपटे यांना‘नारी शक्ती’ राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली : अनाथाची आई डॉ. सिंधुताई सपकाळ आणि ‘भारतीय स्त्री शक्ती’ या संस्थेच्या अध्यक्षा उर्मिला बळवंत आपटे या दोन महिलांची निवड महाराष्ट्रातून ‘नारी शक्ती’ राष्ट्रीय पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्यावतीने जागतिक महिला दिना निमित्त दरवर्षी राष्ट्रीय ‘नारी शक्ती पुरस्काराचे’ वितरण राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात केले जाते. वर्ष 2017 च्या पुरस्कारासाठी देशभरातील अनेक मान्यवर महिलांसह महाराष्ट्रातील दोन महिलांचा सन्मान होणार आहे.
डॉ. सिंधुताई सपकाळ यांचा जीवनपट
अनाथाची आई म्हणून व्रत स्वीकारलेल्या जेष्ठ समाज सेविका सिंधुताई सपकाळ यांनी अतिशय प्रतिकुल परिस्थितीतआपले आयुष्य व्यतीत करून शेकडो अनाथांना आईची माया दिली. त्यांच्या या संघर्षाची दखल घेत त्यांना यापूर्वी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. सिंधुताई सपकाळ उपाख्य माई म्हणूनच त्या सर्व परिचित आहेत. सिंधुताईंचा जन्म हा वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथील आहे. निराश्रीतांच्या कल्याणसाठी माईंनी त्यांच्या मुलीला ममताला दगडूशेट हलवाई मंदिर समितीकडे मुलीला सांभाळण्यासाठी दिले. माईंनी स्वत:च्या मुलगी ममताला सहज सांभाळू शकल्या असत्या. मात्र, आईची भावना आपल्या पोटच्या पोरी प्रति अधिक राहील म्हणून त्यांनी तीला सोबत ठेवले नाही. महाराष्ट्र-मध्य प्रदेशाच्या सीमेवर मेळघाट व्याघ्र प्रकल्पासाठी स्थान निश्चिती होत होती. या प्रकल्पासाठी जंगलातील ८४ गावातील आदिवासी निर्वासित होणार होते. त्यांच्या पुनर्वसनसाठी शासनाकडे कोणतीही योजना नव्हती. माईंनी या आदिवाशी लोकांची बाजू शासनासमोर मांडून त्यांना न्याय मिळवून दिला. आज महाराष्ट्रात माईंचे चार अनाथआश्रम आहेत. काही वर्षांपूर्वी माईंनी चिखल द-यात वसतीगृह सुरु केले. ब-याच मुली या ठिकाणी राहून शिक्षण घेत आहेत. दोन दिवसाच्या मुलापासून ७२ वर्षाच्या वृध्दापर्यंत सगळीच त्यांची मुले आहेत. बरीचशी मुले शिकून स्वतःच्या पायावर उभी आहेत. यामध्ये डॉक्टर, वकील, शिक्षक आहेत. त्यांची मुलगी ममताही आता त्यांच्या या कामात त्यांना मदत करते. सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर बनलेला सिनेमा खूप गाजला. त्यांच्या कामाची दखल घेत डॉ. डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेटच्या उपाधीने सन्मानित केले.
उर्मिला आपटे यांचा जीवनपट
मुंबई येथील ‘भारतीय स्त्री शक्ती’ या स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्षा उर्मिला बळवंत आपटे आहेत. यांना त्यांच्या संस्थेच्यावतीने महिलांच्या सर्वांगिन विकासासाठी केलेल्या कामाच्या योगदानबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतीय स्त्री शक्ती ही स्वयंसेवी संस्था महिलांचे शिक्षण आणि कौशल्य विकास, मानसिक आणि शारिरिक आरोग्य, स्वाभीमान, आर्थिक स्वातंत्र्य तसेच लिंग समानता या पंचसुत्रीवर मोहिम, सर्वेक्षण, संशोधन, कार्यशाळा, प्रशिक्षणांच्या माध्यमातून सपुदेशनाचे कार्य करते