महाराष्ट्रात केरळ पॅटर्न राबवणार : दीपक केसरकर
मुंबई : केरळ कृषी विद्यापीठामार्फत अन्न सुरक्षा दल ही संकल्पना राबविण्यात येत आहे. अन्न सुरक्षा दल ही संकल्पना अतिशय उपयुक्त असून त्याचे अनुकरण महाराष्ट्रात करण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे वित्त व नियोजन व गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी दिलीय. केसरकर यांनी नुकतीच केरळ कृषी विद्यापीठाच्या मनुठ्ठी येथील कृषी संशोधन केंद्राला भेट देऊन विद्यापीठाच्या अन्न सुरक्षा दल (आर्मी) संकल्पना व कृषी उपकरण तंत्रज्ञानातील नव्या संशोधनांची माहिती घेतली.
केरळ कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आर. चंद्राबाबू यांच्याशी श्री. केसरकर यांनी चर्चा केली. अन्न सुरक्षा दल, कृषी उपकरणे सेवा व दुरुस्ती केंद्र, कृषी यंत्राच्या सेवा व दुरुस्तीसाठीचे मोबाईल युनिट ही नाविन्यपूर्ण मॉडेल असून शेती क्षेत्राच्या विकासासाठी उपयुक्त ठरणार आहेत. केवळ अशा अभिनव आणि व्यावहारिक दृष्टिकोनातूनच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणे शक्य आहे. महाराष्ट्रात प्रथम दोन जिल्ह्यांमध्ये अन्न सुरक्षा दल व कृषी यंत्र उपकरणे सेवा व दुरुस्ती केंद्र ही मॉडेल स्वरुपात सुरु करण्यात येतील. महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात पीक पद्धती वेगवेगळी आहे. कोकणमधील पीकपद्धती ही केरळमधील पिक पद्धतीप्रमाणे आहे. तर मध्य महाराष्ट्रात ऊस व हळद उत्पादन होते तर विदर्भात कापूस व संत्र्यांचे उत्पादन होते. त्यामुळे प्रत्येक विभागानुसार अन्न सुरक्षा दल व कृषी तंत्र सेवा केंद्रांचे काम भिन्न होते. त्यासाठी वेगळे मॉडेल विकसित करण्यासाठी केरळ विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी यासाठी सहकार्य केले जाणार आहे.