आशुतोष ठाकूर आणि अतुल राजोळी यांच्या प्रयत्नामुळे

हेमलकसा उजळणार सौरऊर्जेने 

डोंबिवली :- ( शंकर जाधव ) : लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशिप ऍण्ड एक्सलन्स’ या संस्थेचा दशकपूर्ती सोहळा नुकताच संपन्न झाला. या सोहळ्याचे औचित्य साधून हेमलकसा येथील लोकबिरादरीचे डॉ. प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांना सौर इंजिनीअर कन्सल्टंट प्रा.लि चे आशुतोष ठाकूर आणि लक्ष्यवेधी परिवार यांच्या वतीने हेमलकसा प्रकाशित करण्यासाठी “सौरउर्जा प्रकल्प” भेट देण्यात आला.  दादर येथील वीर सावरकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांची उपस्थिती होती.

“आजच्या छोट्या उद्योजकांना आणि भविष्यात होणाऱ्या उद्योजक यांना माझे एकच सांगणे आहे की आज खेडोपाडी छोट्या उद्योजकांची नितांत गरज आहे. तुम्ही जे उत्पादन बनवता ते तिथे येऊन विकण्यापेक्षा तेथील लोकांना ते उत्पादन बनवण्याचे प्रशिक्षण द्या. यामुळे तेथील लोकांना रोजगार निर्माण होईल. आशुतोष ठाकूर आणि त्यांच्या सहकार्यांनी उचललेले हे पाऊल कौतुकास्पद आहे. नफा आणि तोट्याच्या दुनियेत समाजाचा विसर पडायला नको.” असा संदेश डॉ. प्रकाश आमटे यांनी दिला. या प्रकल्पाची आखणी, उभारणी सौर इंजिनीअर कन्सल्टंट प्रा.लि चे सोलर ग्रीड इंजिनीअर आशुतोष ठाकूर यांनी केली आहे. हेमलकसा सारख्या अतिदुर्गम भागामध्ये काजव्याप्रमाणे आपण थोडा तरी उजेड करू शकतो हा या संकल्पनेचा पाया आहे असे आशुतोष ठाकूर म्हणाले. हेमलकसा येथील आदिवासी व्यक्तीच्या आयुष्यात प्रकाशाचा एक झोत आणू शकतो असे ‘लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशिप ऍण्ड एक्सलन्स’ चे संस्थापक अतुल राजोळी यांना वाटते. या कामाची संकल्पना लक्ष्यवेधचे सर्वेसर्वा अतुल राजोळी यांची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *