अनोख्या ‘मिसळ महोत्सवातून मिळणारा निधी आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी
डोंबिवली :– येडा, बोका, झटका, नादखुळा, मस्ती, धुमशान ही नावं ऐकून तुमच्या डोळ्यासमोर नेमकं काय येतं हो? तुम्हाला असं वाटू शकतं की एखाद्या कट्टयावर बसलेल्या तरुणाईच्या तोंडातील शब्द असावेत. मात्र तसं अजिबात काही नाही. डोंबिवलीत शिवसंस्कृती प्रतिष्ठानतर्फे स.वा.जोशी विद्यालयाच्या मैदानावर आयोजित ‘मिसळ महोत्सवा’तील मिसळीच्या प्रकारांची ही नावं आहेत.या मिसळ महोत्सवातील प्रवेश शुल्कामधून जमा होणारे पैसे हे आदिवासी पाड्यावरील मुलांच्या शैक्षणिक उपक्रमासाठी दिले जाणार असल्याचे आयोजक भाऊ चौधरी यांनी सांगितले.
काय चक्रावलताना ही नावं वाचून? पण खरंच ही मिसळीच्या वेगवेगळ्या प्रकारांची नावं आहेत. शिवसंस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊसाहेब चौधरी यांनी डोंबिवलीत पहिल्यांदाच या अनोख्या मिसळ महोत्सवाचे आयोजन केले आहे. ज्यामध्ये डोंबिवलीतील स्थानिक मिसळ विक्रेत्यांबरोबरच नाशिक, पुणे, कोल्हापूर, संगमेश्वर, ठाण्यातील तब्बल 20 मिसळ व्यावसायिक सहभागी झाले आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या चवीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या एकाहून एक स्वादिष्ट मिसळ खाण्याची संधी शिवसंस्कृतीने या मिसळ महोत्सवाच्या माध्यमातून एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे.
ठसकेबाज, झणझणीत, चमचमीत आणि चविष्ट अशा पांढऱ्या, काळ्या, तांबड्या, हिरव्या रस्स्यातील मिसळ खाण्यासाठी खवय्यांची गर्दी नाही झाली तरच नवल. केवळ आतमध्येच नव्हे तर या शाळेच्या बाहेरून जातानाही या चविष्ट मिसळीचा गंध दरवळत आहे. आजपासून 3 दिवस म्हणजे रविवरपर्यंत हा महोत्सव चालणार आहे. या मिसळ महोत्सवातील प्रवेश शुल्कामधून जमा होणारे पैसे हे आदिवासी पाड्यावरील मुलांच्या शैक्षणिक उपक्रमासाठी दिले जाणार असल्याचे आयोजक भाऊ चौधरी यांनी सांगितले.