डोंबिवलीत मनसेची गांधीगिरी : वीज अधिका-याला कोळसा भेट
डोंबिवली : ऐन दिवाळीत राज्यात वीजभारनियमन सुरू केले असल्याने जनतेत संताप व्यक्त होत असतानाच शुक्रवारी मनसेने डोंबिवलीतील अन्यायकारक वीजभारनियमनाविरोधात गांधीगिरी स्टाईलने आंदोलन करीत, वीज अधिका-यांना कोळसा भेट देऊन निषेध व्यक्त केला.
डोंबिवलीत वीज बिलभरणा शंभर टक्के आहे तसेच वीज गळतीचे प्रमाणही अत्यल्प आहे. त्यामुळे डोंबिवलीला अ श्रेणीचा दर्जा आहे. मात्र तरीसुध्दा डोंबिवलीत लोडशेडींग सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे डोबिवलीकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अन्यायकारक लोडशेडींग विरोधात मनसेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी महावितरणच्या कार्यालयावर धडक देत अतिरिक्त कार्यकारी अभियंता अविनाश कलढोणे यांची भेट घेतली. दिवाळी सण तोंडावर आला आहे विद्याथ्यांच्या परीक्षा सुरू आहेत असे असतानाही डोंबिवलीतील अन्यायकारक वीजभारनियमन त्वरीत रद्द करण्यात यावे अशी मागणी शिष्टमंडळाने केली. यावेळी सरकारच्या धोरणाचा निषेध म्हणून अधिका-यांना कोळसा म्हणून दिवाळी भेटही देण्यात आली. याप्रसंगी मनसे डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज प्रकाश घरत,प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम,गटनेते प्रकाश भोईर,राहुल कामत,महीला शहर अध्यक्षा मंदा पाटील,दिपक शिंदे,वेद पांडे,स्मिता भणगे,प्रतिभा पाटील,अरुण जांभळे उपस्थित होते.