भीम आर्मीची उद्या मुंबईत सरकारविरोधात निदर्शने
मुंबई – भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेच्यावतीने विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने सरकारविरोधात रोष व्यक्त करण्यासाठी शनिवारी दि २४ फेब्रुवारी २०१७ रोजी, दुपारी ३ वाजता हनुमान मंदिराच्या बाजूला दादर (पूर्व) मुंबई येथे निदर्शने करण्यात येणार आहेत . संघटनेचे महाराष्ट्र प्रमुख अशोकभाऊ कांबळे, महिला आघाडीच्या नेत्या नेहाताई शिंदे, महासचिव सुनील थोरात, सुनील गायकवाड मुख्य प्रवक्ता अमोल मडामे तसेच कोअर कमिटी सदस्य मुंबई उपप्रमुख अविनाश गायकवाड, सचिव विक्रांत लव्हांदे , दादू लव्हांडे, जिल्हाप्रमुख संजय भालेराव, संतोष वाकळे, प्रितेश चितळे, भीम आर्मीचे हितचिंतक सुप्रसिद्ध शाहीर संभाजी भगत आदी उपस्थित राहणार आहेत.
भीम आर्मी भारत एकता मिशनचे संस्थापक अॅड. चंद्रशेखर आझाद यांच्यावरील अन्यायकारक रासुका रद्द करून त्यांची मुक्तता करावी, भिमा कोरेगाव दंगलीस जबाबदार मिलिंद एकबोटे व मनोहर कुलकर्णी तथा संभाजी भिडे यांना त्वरीत अटक करावी, भिमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ आंदोलक भिमसैनिकांवर दाखल केलेले अन्यायकारक खटले रद्द करून त्यांना निर्दोष सोडण्यात यावे. मिलिंद एकबोटे यांना अटक करावी या मागणीसाठी न्यायालयात लढत असलेले अॅड.नितीन सातपुते आणि हस्तक्षेप याचिकाकर्ता संजय भालेराव व इतरांना सरकारी खर्चाने सुरक्षा व्यवस्था द्यावी आदी मागण्यासाठी हि निदर्शने होणार आहेत. संघटनेच्या वतीने या मागण्यासंदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आलाय. मात्र सरकारकडून कोणतीच कारवाई केली जात नसल्याने शासना विरोधात आंबेडकरी जनतेत असंतोष पसरलाय. शासनाचे लक्ष वेधण्यासाठीच ही निदर्शने करण्यात येत असल्याचे संघटनेचे मुंबई प्रमुख अॅड रत्नाकर डावरे यांनी सांगितले. भिम आर्मीच्या जिल्हा व तालुका प्रमुखांनी तसेच कार्यकर्त्यांनी आणि आंबेडकरी जनतेनं मोठ्या संख्येने सामिल व्हावे असे आवाहन भीम आर्मीच्या वतीने करण्यात आलय.