डोंबिवलीचा प्रसन्न रोझेकर स्वीय सहाय्यक पदाच्या परिक्षेत देशात प्रथम
डोंबिवली – विधी व न्याय विभागातंर्गत स्वीय सहाय्यक या पदांसाठी घेण्यात आलेल्या मराठी लघुलेखक परिक्षेत डोंबिवलीचा प्रसन्न रोझेकर याने भारतात सर्वप्रथम येण्याचा मान मिळवलाय. रात्र महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेत व पेपरचा स्टॉल चालवून प्रसन्नने मिळविलेल्या यशाने डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय.
या परिक्षेला 37 विद्यार्थी बसले होते. या परिक्षेत प्रसन्नने 95.05 मार्क्स मिळविले आहेत. प्रसन्न हा डोंबिवली पूर्वेतील डीएनसी रोडवरील श्रमसाफल्य इमारतीत राहतो. त्यांचे शालेय शिक्षण जोंधळे हायस्कूल येथून झाले. तर स्वामी विवेकानंद रात्र महाविद्यालयातून तो वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्षाला शिकत आहे. त्यांचे वडील तुळशीदास हे रिक्षाचालक आहेत. आई संगीता या गृहिणी आहे. त्याला एक मोठा भाऊ आहे. प्रसन्न हा नोकरी करीतच रात्रमहाविद्यालयातून शिक्षण पूर्ण करीत आहे. प्रसन्नला लघुलेखनातच करियर करण्याची इच्छा आहे.