मुंबईत थॅलेसेमियाचे सुमारे २ हजार रुग्ण : महापालिकेच्या ‘सुपरस्पेशालिटी’ उपचार केंद्रात ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’ सुविधा

 थॅलेसेमियाग्रस्त मुलांना मिळणार दिलासा : गरजू रूग्णांवर मोफत उपचार

मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रात थॅलेसेमियाचे सुमारे २ हजार रूग्ण आहेत. या रूग्णांची गरज ओळखून महापालिकेने बोरिवली पूर्व परिसरात गेल्या वर्षी सुरु केलेल्या ‘सुपरस्पेशालिटी’ उपचार केंद्रात मार्च २०१८ पासून ‘बोन-मॅरो’ प्रत्यारोपणाची सुविधा देण्यात येणार आहे. यासाठी खाजगी रुग्णालयात सुमारे अंदाजे २० ते २५ लाख रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे. पण ही सुविधा गरजू रुग्णांना मोफत स्वरुपात मिळू शकणार आहे. तसेच या उपचार केंद्रात बालकांमधील रक्तदोष, कर्करोग यावर देखील उपचार करण्याची सुविधा उपलब्ध आहे, अशी माहिती उपचार केंद्राच्या संचालिका डॉ. ममता मंगलानी यांनी दिलीय.

‘बोन-मॅरो’ अनुरुप असल्याची चाचणी सकारात्मक आल्यानंतर ‘बोनमॅरो ट्रान्सप्लांट’ करण्यासाठी अंदाजे रु. १२ लाख प्रति रुग्ण एवढा खर्च अपेक्षित आहे. मात्र, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुलांसाठी कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. तसेच रुग्ण दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील नसल्यास त्यांना यथाशक्ती शुल्क भरण्यास विनंती करण्यात येईल. त्यांनी त्यांच्या क्षमतेनुसार योग्य ती रक्कम जमा केल्यानंतर उर्वरित रक्कमेसाठी दानशूर संस्थांच्या मदतीतून उपचारांचा खर्च भागविला जाणार आहे. ‘बोन-मॅरो ट्रान्सप्लांट’ हे सामान्यपणे ८ वर्षे वयापर्यंतच्या मुलांमध्ये केला गेल्यास चांगले परिणाम मिळतात. तसेच रुग्णाच्या भावाचा किंवा बहिणीचा ‘बोन-मॅरो’ अनुरुप ठरण्याची शक्यता अधिक असते. या प्रत्यारोपणामुळे रुग्ण थॅलेसेमिया मुक्त होण्याची शक्यता साधारणपणे ८० ते ९० टक्के असते. ‘बोन-मॅरो ट्रान्सप्लांट’चा उपचार कालावधी हा साधारणपणे एक महिन्याचा असतो. यानुसार ‘बोन-मॅरो’ ट्रान्सप्लांटबाबत या केंद्रात वर्षभरात ६० ते ८० रुग्णांवर प्रत्यारोपण कार्यवाही होऊ शकेल असेही त्यांनी सांगितलं.

‘बोन-मॅरो’ प्रत्यारोपणासाठी ‘एचएलए’ अनुरुप असल्याची चाचणी करणे आवश्यक असते. ही चाचणी बाहेरच्या प्रयोगशाळेतून करुन घेण्याची सोय उपचार केंद्रात करण्यात आली आहे. या चाचणीसाठी रु. ५ हजार प्रति चाचणी एवढे शुल्क संबंधित प्रयोगशाळेद्वारे आकारले जाते. तथापि, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुलांसाठी ही सुविधा मोफत असणार आहे. तसेच आर्थिक दृष्ट्या आव्हानात्मक परिस्थिती असणा-या मुलांकडून शुल्क न घेता दानशूर संस्थांच्या मदतीतून हा खर्च भागविला जाणार आहे. सध्या मुंबईतील सार्वजनिक रुग्णालयांपैकी दोन रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये शीव परिसरात असणारे महापालिकेचे लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालयात आणि केंद्र सरकारचे टाटा स्मृती रुग्णालय यांचा समावेश आहे.

काय आहे थॅलेसेमिया
‘थॅलेसेमिया’ग्रस्त रुग्णांमध्ये योग्य त्या प्रमाणात रक्त तयार होत नसल्याने त्यांना नियमितपणे रक्त देण्याची गरज असते. मात्र, या रुग्णांमध्ये अनुरुप बोन-मॅरोचे प्रत्यारोपण यशस्वीपणे करण्यात आल्यास त्यांचे शरीर आवश्यक त्या प्रमाणात रक्त पेशी, पांढ-या पेशी व प्लेटलेट्स तयार करु लागते. परिणामी संबंधित रुग्ण थॅलेसेमिया मुक्त होऊन आपले पुढील आयुष्य सामान्यपणे जगू शकतात.
अशी असते ‘ बोन-मॅरो ट्रान्सप्लांट ‘
थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांमध्ये लाल पेशी दुषित असल्यामुळे, त्यांच्या शरीरात योग्य त्या प्रमाणात रक्त तयार होत नाही. त्यामुळे त्यांना नियमितपणे अनुरुप रक्तदात्याचे रक्त घेऊन लाल पेशी द्याव्या लागतात. तथापि, अशा रुग्णांच्या शरीरात अनुरुप ‘बोन-मॅरो’ चे प्रत्यारोपण यशस्वीपणे केल्यास त्यांचे शरीर आवश्यक त्या प्रमाणातील पेशींसह रक्त तयार करु लागते. ज्यामुळे ‘बोन-मॅरो’च्या यशस्वी प्रत्यारोपण झाल्यानंतर या रुग्णांना रक्त देण्याची आवश्यकता भासत नाही व रुग्ण थॅलेसेमिया मुक्त होतो.

बोरीवलीत नव्या उपचार केंद्रात सुविधा
एप्रिल २०१७ मध्ये बोरिवली पूर्व परिसरातील मेट्रो मॉलच्या पाठीमागे असणा-या ‘सीसीआय कंपाऊड’ परिसरातील तीन मजली इमारतीत ‘सुपरस्पेशालिटी उपचार केंद्र’ महापालिकेद्वारे सुरु करण्यात आले. सुमारे २५ हजार चौरस फूट जागेत असणारे हे उपचार केंद्र सुरु करण्यासाठी टाटा ट्रस्ट, सिप्ला फाउंडेशन व थिंक फाउंडेशन यासारख्या सामाजिक संस्थानी विशेष मदत केली होती. या सुपरस्पेशालिटी उपचार केंद्रामध्ये सध्या थॅलेसेमिया, रक्तदोष, कर्करोग रुग्णांकरिता १५ खाटा राखीव आहेत. तर ८ खाटा ‘बोन-मॅरो’ प्रत्यारोपणासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच ६ खाटा या ‘केमोथेरपी’ उपचारांसाठी राखीव आहेत. याव्यतिरिक्त २२ खाटा या दैनंदिन स्वरुपात दाखल होणा-या रुग्णांमध्ये रक्त संक्रमण करण्यासाठी वापरल्या जातात. महापालिकेच्या सुपरस्पेशालिटी उपचार केंद्रात लवकरच सुरु होणा-या ‘बोन-मॅरो’ प्रत्यारोपणासाठी सध्या १५ रुग्णांची नावे नोंदविण्यात आली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *