भविष्यातील बदलांना तयार रहा, मात्र आपली संस्कृती विसरू नका
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे : जगभरातील सर्वाधिक तरुणांची संख्या असणारा आपला देश आहे. तरुण हीच आपल्या देशाची शक्ती आहे, याच जोरावर भारत हा जगात महासत्ता होणार आहे, यासाठी भविष्यातील बदलांना तयार रहा, मात्र आपली संस्कृती विसरू नका,असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. पुणे येथील सिंबायोसिस लॉ स्कूलच्या ‘सिम्भव 2018’ या दहाव्या आंतर-महाविद्यालयीन वार्षिक सांकृतिक महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. सिम्बॉयसिस इंटरनॅशनल (अभिमत विद्यापीठ)चे कुलपती डॉ. शां. ब. मुजूमदार अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमास सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, आमदार जगदीश मुळीक, सिम्बॉयसिस इंटरनॅशनल (अभिमत विद्यापीठ)च्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, सिम्बॉयसिस लॉ स्कूलच्या संचालक डॉ. शशिकला गुर्पूर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,“वसुधैव कुटुंबकम” ही आपल्या देशाची संस्कृती आहे. शिकागो येथे झालेल्या जागतिक धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी आपल्या भाषणाची सुरूवात “भगिनींनो आणि बंधूंनो” अशी करून आपल्या संस्कृतीची ओळख जगाला करून दिली होती. आपल्या देशावर ग्रीक, शक, इंग्रज, पोर्तुगीज, डच, मुघल अशा अनेकांनी आक्रमणे केली. मात्र या आक्रमणानंतरही आपल्या देशाची संस्कृती टिकून आहे. आपल्या देशात असणाऱ्या ज्ञानामुळेच आपले जगातील स्थान टिकून आहे. अनेक नद्या एकत्र येवून ज्या प्रमाणे सुंदर समुद्र तयार होतो, त्याच प्रमाणे विविध श्रध्दा, संस्कृतींच्या मिश्रणाने आपली भारताची संस्कृती तयार झाली आहे असेही ते म्हणाले.
डॉ. शां. बं. मुजूमदार म्हणाले, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण हा महत्वाचा घटक आहे. आयटी म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नव्हे तर इंडीयन टॅलेंट असे नमूद करून महाराष्ट्र आणि देशाच्या विकासासाठी या टॅलेंटचा लाभ घ्यायला हवा. “मॅग्नेटिक महाराष्ट्र”चे आयोजन करून देश आणि विदेशातील गुंतवणुकदारांना निमंत्रित केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते विमानतळासमोरील मार्गाच्या “सिंम्बॉयसिस मार्ग” या फलकाचे उद्घाटन झाले.