मुंबईतील कोस्टल रोडच्या कामाचा श्रीगणेशा पावसाळयापूर्वीच
मुंबई : सागरी किनारा मार्गाच्या पहिल्या टप्पाच्या कामाची सुरुवात पावसाळयापूर्वी करण्यात येणार असून मार्चमध्ये निविदा उघडून लवकरात लवकर कार्यादेश देण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिलीय.
वांद्रे – कुर्ला संकुल येथील मॅग्नेटिक महाराष्ट्र या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात मुंबई महानगरपालिकेने ‘मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प’या विषयावर दालन उभारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रविवारील दालनाला भेट दिली त्यावेळी महापालिका उप आयुक्त (अभियांत्रिकी ) कुकनूर व प्रमुख अभियंता (सागरी किनारा रस्ता) माचिवाल यांचेकडून माहिती घेतली. तसेच सेामवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दालनाची पाहणी करून अधिका-यांचे कौतूक केलं. आतापर्यंत सुमारे दोन हजार ५०० जणांनी आणि ५० विदेशी पाहुण्यांनी या कक्षास भेट दिली.
असा असेल मार्ग ….
दक्षिण मुंबईतील प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी लिंक याला जोडणारा ०९.९८ किलोमीटरचा हा सागरी मार्गाचा पहिला टप्पा असून या मार्गावर प्रत्येकी ३.४५ किलोमीटरचा एक याप्रमाणे दोन बोगदे उभारण्यात येणार आहे. त्यासोबतच ९० हेक्टरवर भरणी करण्यात येऊन हा संपूर्ण परिसर हिरवा ठेवण्यात येणार आहे. या सागरी मार्गावर सायकल ट्रॅक, उद्यान, मल्टीस्टोअर कार पार्किग तसेच बी.आर.टी.एस. बस डेपोची उभारणी करण्यात येणार आहे. या मार्गामुळे ७० टक्के वेळेची बचत व ३४ टक्के इंधनाची बचत होणार आहे. हा मार्ग सिग्नलमुक्त व टोलमुक्त राहणार असल्याने मुंबईच्या पश्चिम भागाची वाहतूकोंडीतून मुक्तता होणार आहे.
———