महामित्र’ ठरले देशात प्रथम क्रमांकाचे ‘सोशल’ ॲप

‘सोशल मीडिया महामित्र’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; २५ हजार समाजमाध्यमकारांचा सहभाग

मुंबई : विविध समाजमाध्यमांच्या वापरातून विवेकशील समाजनिर्मिती करण्याबरोबरच या समाजमाध्यमांचा विधायक कार्यात सकारात्मक उपयोग करुन घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या ‘सोशल मीडिया-महामित्र’ उपक्रमाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आजपर्यंत २५ हजारांपेक्षा अधिक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला आहे. या उपक्रमास लाभत असलेल्या उदंड प्रतिसादानंतर ‘ॲपब्रेन’ या संकेतस्थळाने ‘महामित्र’ ॲपला देशात प्रथम क्रमांकाचे ‘सोशल’ ॲपचे रॅकिंग केल्याने ‘महामित्र’ची लोकप्रियता वाढत चालली आहे.

ज्ञान आणि मनोरंजनाच्या साधनाबरोबरच लोकांची मने आणि मते घडविण्याची ताकद सोशल मीडियामध्ये असल्याचे आता सिद्ध झाले आहे. विधायक संदेशाची देवाण-घेवाण होत असेल तर विवेकी समाज तयार होतो हे सूत्र लक्षात घेऊन या सकारात्मक बाबींसाठी समाजमाध्यमांचा प्रभावीपणे उपयोग करणाऱ्या समाजमाध्यमकारांचा गौरव करण्याच्या दृष्टीने ‘सोशल मीडिया-महामित्र’ उपक्रम राज्यात राबविण्यात येत आहे. सर्वसाधारपणे प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे त्या भागातील प्रभावी समाजमाध्यमकारांची विविध निकषांच्या आधारे निवड करून त्यांना मा. मुख्यमंत्री तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात येणार आहे. सोशल मीडिया क्षेत्रातील प्रभावी व्यक्तींना भेटण्याची, प्रत्यक्ष संवाद साधण्याची, सेल्फी घेण्याची संधीदेखील मिळणार आहे.

या उपक्रमात विशेषत: ग्रामीण भागातून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत असून सर्वस्तरातून समाजमाध्यमकार सहभागी होत आहेत. यामध्ये युवक-युवती अग्रस्थानी आहेत. काल सायंकाळपर्यंत २५ हजारांपेक्षा अधिक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला आहे. १८ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी सुरु राहणार असून ‘सोशल मीडिया-महामित्र’ उपक्रमात राज्यातील तरुणांसह महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
‘गुगल प्ले स्टोअर’ अथवा ॲपलच्या ‘ॲप स्टोअर’ वरुन महामित्र (MahaMitra) हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करुन नोंदणी करता येणार आहे. या उपक्रमात राज्यातील १५ वर्षावरील कोणीही रहिवासी विनाशुल्क सहभागी होऊ शकेल. प्रत्येक तालुक्यातून (क्षेत्रातून) प्रत्येकी १० ‘सोशल मीडिया महामित्र’ निवडले जाणार असून त्यांना जिल्हास्तरावर विशेष कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जाईल. या महामित्रांची जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक यांच्या समवेत समाज माध्यमाच्या सदुपयोगाबाबत गटचर्चा आयोजित करण्यात येईल. या गटचर्चेअंती तालुक्यातील (क्षेत्रातील) प्रत्येकी १ महामित्राची राज्यस्तरावर होणाऱ्या कार्यक्रमासाठी निवड करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या राज्य स्तरावरील कार्यक्रमात समाज माध्यम क्षेत्रात प्रभावी अशा विविध क्षेत्रातील प्रतिष्ठितांना आमंत्रित करण्यात येईल. या कार्यक्रमात निवडलेल्यांना ‘सोशल मीडिया महामित्र’ पुरस्कार देण्यात येईल तसेच त्यांना मान्यवरांशी संवाददेखील साधता येणार आहे. विहित निकषात असलेल्या ७५ गुणांच्या आधारे प्रत्येक तालुक्यातील (क्षेत्रातील) टॉप २० सहभागी व्यक्तींची प्राथमिक फेरीत निवड करण्यात येईल. सहभागी व्यक्तीने या मोहिमेकरिता एक संदेश (मजकूर, ॲनिमेशन, ग्राफिक्स आदी) तयार करावा व तो ॲपमार्फत आयोजकांना पाठवावा. या संदेशाच्या आधारे २० मधून १० जणांची गट चर्चेसाठी निवड करण्यात येईल. गटचर्चेतील सहभागाआधारे १५ पैकी गुण देऊन या १० व्यक्तींपैकी एकाची राज्यस्तरावरील कार्यक्रमासाठी निवड करण्यात येणार आहे. त्यात त्यांना ‘सोशल मीडिया-महामित्र’ म्हणून गौरविण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *