मराठवाडा- विदर्भात गारपीट दोघांचा मृत्यु, पिकांचे नुकसान : पंचनामे करण्याचे कृषी मंत्र्यांचे आदेश 

मराठवाडा- आज सकाळी मराठवाडा आणि विदर्भात गारपिट झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असतानाच, गारपिटीच्या तडाख्यामुळे दोघांना जीव गमवावा लागलाय. जालन्यातील वंजार उमरद गावातील येथील 70 वर्षीय नामदेव शिंदे यांचा गारा अंगावर पडून मृत्यू झाला. तर वाशिममध्ये महागाव येथे यमुना हुंबाड या महिलेचा दुर्दैवी अंत झालाय. गारपिटीमुळे शेतीच्या नुकसानीचे पंचनामे कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने करावेत. जिल्हा प्रशासनाने उद्या विमा कंपन्यांची बैठक घेऊन गावनिहाय आकडेवारी त्यांना उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज दिले.

मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशात अनेक जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह पाऊस झाल्याने शेती व घरांचे नुकसान झाले. कधी नव्हे इतकी मोठी गारपिट झाली. गारपिटीमुळे दोघांचा मृत्यू झालाय. गारांचा खच शेतात पडला होता. गारांमुळे जालना तालुक्यातील द्राक्ष, डाळिंब उत्पादक शेतक-यांचं मोठं नुकसान झालं आहे. ज्वारी, गहू, हरभरा, कांदा पिकांचे नुकसान झालंय.  या नुकसानीचे सरकारने तातडीने स्थळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ट्विटर द्वारे केली. याचा आढावा कृषिमंत्र्यांनी घेतला. त्यांनी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विजयकुमार यांच्याशी दूरध्वनीवरून राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाबाबत चर्चा केली. ज्या गावांमध्ये गारपीट व अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाच्या उभ्या पिकाचे तसेच काढणी पश्चात मळणीसाठी ठेवलेल्या धान्याचे नुकसान झाले आहे त्याबाबत माहिती त्वरित विमा कंपन्यांना कळवावी. यासाठी जिल्हाधिकारी, कृषी अधिकाऱ्यांनी उद्या संबंधीत विमा कंपन्यांची बैठक घ्यावी व त्यांना झालेल्या नुकसानाबाबत गावनिहाय शेतकऱ्यांची माहिती द्यावी. त्याचबरोबर पुढील दोन ते तीन दिवसातील माहितीही इमेल द्वारे देण्याची व्यवस्था करावी जेणेकरून संबंधित विमा कंपनीला बाधित शेतकऱ्यांची आकडेवारी उपलब्ध करून देत येईल. स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे तलाठी, ग्रामसेवक, सहायक कृषी अधिकारी यांनी देखील पंचनामे जिल्हा प्रशासनाला सादर करून मदतीबाबत प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाकडे सादर करावा, अशा सुचना कृषिमंत्र्यांनी प्रशासनाला केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!