कल्याण-डोंबिवलीत रस्ते, गटार आणि पेव्हर ब्लॉकच्या कामांमध्ये कोटयावधीचा घोटाळा ?

नियम धाब्यावर बसवून खासगी सोसायटीत पेव्हर ब्लॉकची कामे

माजी विरोधी पक्षनेते रमेश म्हात्रे यांचा भांडाफोड 

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत रस्ते, गटार आणि पेव्हर ब्लॉकची कामे करताना कोटयावधी रूपयांचा भ्रष्टाचार होत असल्याच्या प्रकरणाचा भांडाफोड माजी विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे स्थानिक नेते रमेश पद्माकर म्हात्रे यांनी केलाय. गेल्या दोन वर्षापासून ते महापालिका, अॅण्टी करप्शन विभागाकडे पाठपुरावा करीत आहेत. दोन  दिवसांपूर्वीच बाजारपेठ पोलिसांकडूनही जाब जबाब नोंदविण्यात आल्याची माहिती म्हात्रे यांनी दिली. त्यामुळे महापालिकेतील नवा घोटाळा उघडकीय येण्याची शक्यता आहे.

खासगी गृहनिर्माण संस्था अथवा खासगी इमारतीच्या कंपाऊंडमध्ये पेव्हर ब्लॉकची कामे करता येत नाहीत. मात्र कल्याण डोंबिवलीत ७० टक्के पेव्हर ब्लॉकची कामे  नियमबाहयपणे  करण्यात आलीत. शासकीय निधीचा गैरवापर करून नगरसेवकांनी मतांसाठीच ही कामे केलेली आहेत असा आरोपही म्हात्रे यांनी केलाय. तसेच ज्या ठिकाणी कामे मंजुर करण्यात आली. त्या कामाचा प्रशासकीय आदेश काढण्यात आला. मात्र प्रत्यक्षात दुस- याच ठिकाणी ही कामे करण्यात आली आहेत. नगरसेवक अधिकारी आणि ठेकेदार यांनी संगनमत करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप म्हात्रे यांनी केलाय. तसेच रस्त्याच्या कामांमध्ये स्टोन पावडरचा वापर करून ही कामेही निकृष्ट दर्जाची करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. गटाराची कामे करतानाही चांगल्या सुस्थितीत असलेली गटार तोडण्यात आली आहेत तर अनेक ठिकाणी गटारांची नादुरूस्ती करून नवीन बिल काढण्यात आल्याचा आरोप म्हात्रे यांनी केलाय. पालिकेतील अधिका-यांविरोधात म्हात्रे यांनी अॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार केलीय. मात्र या प्रकरणाची संबधित विभागाकडून चौकशी करावी असे पत्र अॅन्टी करप्शन विभागाचे पोलीस अधिक्षक संग्रामसिंह निशानदार यांनी पालिका आयुक्तांना पाठवले आहेत. दोन दिवसांपूर्वीच डोंबिवलीतील पेव्हर ब्लॉकमधील एका प्रकरणाचे बाजारपेठ पोलिसांकडून जाब जबाब घेण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष वेधलंय.

असा होतो भ्रष्टाचार
रस्त्याची कामे करताना प्रथम खोदाई केली जाते. त्यानंतर ४ ते ९ इंच दगड सोलींग आणि त्यानंतर ४ ते ६ इंच सीसी सिमेंट काँक्रीट अशा प्रकारची प्रक्रिया आहे. मात्र प्रत्यक्षात ही प्रक्रिया न करता स्टोन पावडर वापरून रस्ते अथवा पेव्हार ब्लॉकची कामे करून भ्रष्टाचार केला जातोय.

एखाद्या रस्त्याचे काम करताना त्या रस्त्याचे नाव नमुद केले जात नाही. संबधित वॉर्डातील अथवा परिसरातील विविध रस्त्यांची कामे अशा प्रकारची मंजुरी घेतली जाते. त्यामुळे नेमका कोणत्या रस्त्याचे काम करण्यात आले हे कळत नाही. त्यामुळे न केलेल्या रस्त्याच्या कामांची बीले काढण्यात येतात.

चामुंडा व्हिला आधीचे सिमेंट कोबा केल्याचा फोटो

  • चामुंडा व्हिलाचे पेव्हरब्लॉक लावल्यानंतरचे फोटो

 सोसायटीत नियमबाह्य कामे, बाजारपेठ पोलिसांकडून जबाब
डोंबिवली पश्चिमेतील प्रभाग क्र ७३ नवागाव आनंदनगर मधील ठाकुरवाडी परिसरातील प्रदीप सोसायटी ते शिवाजी पार्क सोसायटीपर्यंत रस्ता तयार करून पायवाट करणे व पेव्हर ब्लॉक बसवणे या कामाचे प्रशासकीय आदेश काढण्यात आले होते. सुमारे ९ लाख ९९ हजार १६७ खर्चाचे हे काम होतं.  मात्र प्रत्यक्षात हे काम पंडीत दिनदयाळ रोडवरील चामुंडा व्हिला सोसायटी आणि पुनर्वसू सोसायटीत खासगी आवारात करण्यात आले. पालिकेच्या रेकॉर्ड प्लान आणि एमबी रेकॉर्डमध्ये हे काम दाखविण्यात आलय. मंजुरी एका ठिकाणीची प्रत्यक्षात काम दुसरीकडे या प्रकरणाचा भांडाफोड माजी विरोधी पक्षनेते रमेश म्हात्रे यांनी माहितीच्या अधिकारान्वये उजेडात आणलाय. शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक दीपेश म्हात्रे हे स्थायी समितीचे सभापती असतानाच्या कारकिर्दीतील हे काम आहे. या प्रकरणात बाजारपेठ पोलिसांकडून तक्रारदार म्हात्रे आणि सोसायटीच्या कमिटीचे जाबजबाब घेण्यात आले आहेत अशी माहितीही म्हात्रे यांनी दिली.याप्रकरणी महापालिकेच्या संबधित अधिका-यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी म्हात्रे यांनी पालिका आयुक्त पी वेलारासू यांच्याकडे केलीय.

One thought on “कल्याण-डोंबिवलीत रस्ते, गटार आणि पेव्हर ब्लॉकच्या कामांमध्ये कोटयावधीचा घोटाळा ? माजी विरोधी पक्षनेते रमेश म्हात्रे यांचा भांडाफोड”
  1. Really we are living in very poor living conditions higher authorities are taking granted for filling their pockets by all possible means. We feel we cannot do anything but we can change a lot if all of us get united.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!