आईच्या अपमानाचा बदला : ट्युशन टीचरची हत्या करणारा मारेकरी गजाआड
डोंबिवली : कल्याणात एकाच दिवशी तीन हत्या झाल्याच्या घटना ताजी असतानाच रविवारी रात्री डोंबिवलीत एका ट्युशन टीचरची हत्या झाल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडालीय. मनीषा खानोलकर असे त्या ट्युशन टीचरचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी रोहित तायडे या तरुणाला अटक केली आहे .आपल्या आईला शिवीगाळ केल्याने संतापलेल्या रोहित ने खानोलकर यांच्या घरात घुसून त्यांच्या डोक्यात कुकर ने मारत तिची हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे
डोबिवली कोपर गाव येथिल ओम परशुराम अपार्टमेंट मधील फ्लॅट बी / 103 येथे मनीषा खानोलकर या महिला 17 ते 18 वर्षांपासून एकटयाच राहत असुन त्या मुलांचे ट्युशन घेत असत. रविवारी सायंकाळी 4 च्या सुमारास ट्युशनसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचा दरवाजा ठोठावला मात्र त्यांनी दरवाजा उघडला नाही. त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले त्या निपचित पडलेली दिसल्या. त्यांनी ही बाब सोसायटी च्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यानी तत्काळ दरवाजा तोडला असताना मनीषा यांचा मृतदेह स्वयंपाकघरात रक्ताच्या थारोळ्याच्या खोलीत मृत अवस्थेत आढळून आला.तसेच या मृतदेहाच्या शेजारी रक्ताळला कुकर पडला होता . या घटेनची माहिती मिळताच पोलिसांनी हा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पालिकेच्या रुख्मिणीबाई रुग्णालतात पाठविला आहे. शाळेतील मुलांच्या शिकवण्या घेणाऱ्या या महिलेची हत्या कुणी व कोणत्या कारणासाठी केली, याचा तपास पोलिसांनी सुरु केला. मात्र कोणताच धागेदोरे पोलिसांना मिळत नव्हता. काही दिवसांपूर्वी तिचे एका महिलेबरोबर भांडण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसानी महिलेचा शोध घेत तिचा मुलगा रोहित तायडे याला ताब्यात घेतले .त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने केलेल्या कृत्याची कबुली दिली .आपल्या आईसोबत मनीषा यांचे काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. आईचा अपमान केल्याचा राग त्याच्या मनात होता. या रागातून त्याने खानोलकर यांचे घर गाठत घरात घुसून खानोलकर यांच्या डोक्यात कुकरचा प्रहार करून हत्या केल्याची कबुली रोहितने दिल्याचे पोलिसांनी सांगितले .