पर्यटन धोरणाच्या मान्यतेमुळे  निसर्ग पर्यटनाला चालना मिळेल  –  वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

नागपुरात निसर्ग पर्यटन विकास मंडळाच्या कार्यालयाचे उदघाटन

मुंबई (अजय निक्ते) :  निसर्गाच्या सान्निध्यात राहूनच मानवाचे कल्याण झाले आहे अशी शिकवण संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास यांनी आपल्याला देताना निसर्गाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. मानव आणि वनाचे अतुट असे नाते राहीले आहे. राज्यात निसर्ग पर्यटनावाढीसाठी वनविभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या आर्थिक वर्षात निसर्ग पर्यटनाच्या विकासासाठी ९२ कोटी ४ लाख रुपयांचा‍ निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून यामुळे निसर्ग पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास  वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाच्या कार्यालयाच्या उदघाटना प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी वन राज्यमंत्री अंबारीश राजे आत्राम, वन विभागाचे सचिव विकास खारगे, व्यवस्थापकीय संचालक महीप गुप्ता, उमेश कुमार अग्रवाल, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)  अशोककुमार मिश्रा यांची प्रमुख उपस्थिती होती.

निसर्ग पर्यटन विकास मंडळ ही राज्य शासनाचे निसर्ग पर्यटन धोरण राबवणारी प्रमुख संस्था म्हणून कार्य करत असून, भागधारकांशी समन्वय साधून त्यांच्या सहभागाने निसर्ग पर्यटनाला चालना देण्यात येत आहे. भागधारकांची क्षमता वाढवून त्याद्वारे निसर्ग पर्यटनाचे संवर्धन करणे, सामाजिक, सांस्कृतिक वारसा जतन करुन आर्थिकदृष्टया सक्षम करणे, नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वाचा वापर करणे, निसर्ग पर्यटनाची मानके ठरविणे, त्यांच्या परिणामांचे मूल्यांकन करणे, निसर्ग पर्यटनांची प्रसिध्दी करणे, पर्यटकांसाठी सोयीसुविधा पुरविणे आणि त्यांच्या माध्यमांतून स्थानिकांना रोजगार मिळवून देणे या महत्त्वपूर्ण बाबी असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

महाराष्ट्र शासनाच्या वनधोरणानुसार निसर्ग पर्यटनाच्या विकासासाठी संघटीत प्रयत्न करणे गरजेचे असून,त्याची तत्त्वे हितसंबंधाची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे. पर्यटनस्थळांची निवड, त्याची क्षमता आणि बांधणीही महत्त्वपूर्ण असल्याचे वनमंत्र्यांनी यावेळी सांगितले. निसर्ग पर्यटनवाढीसाठी अद्यावत विश्रामगृहांची सुधारणा निसर्ग पथ तयार करण्यावर भर देण्यात येईल. सौरदिवे, पर्यटकांना उत्तम सुविधा देणे, साहसी पर्यटकांसाठीही तशी व्यवस्था निर्माण करण्यावरही विशेष लक्ष देण्यात येत असल्याचे ते म्हणाले. मार्गदर्शकांची संख्या वाढविणे, पर्यटकांना होमस्टे निर्माण करणे, तसेच विद्यार्थ्यासाठी निसर्ग सहलींच्या आयोजनाबाबतही वनविभाग प्रयत्नरत असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

तत्पूर्वी कार्यालयाचे व्यवस्थापकीय संचालक महिप गुप्ता यांनी आपल्या प्रास्ताविकात निसर्ग पर्यटनस्थळांचा विकास, निसर्गाचे विद्यार्थ्याना प्रशिक्षण देणे,स्थानिकांना रोजगार निर्माण करुन देण्याबाबत माहिती दिली. तसेच चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यात पर्यटन विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली असून, गेल्यावर्षी ११३ स्थळांचा विकासाला  मान्यता देण्यात आली आहे. यावर्षी ६८ निसर्ग पर्यटनस्थळांचे काम करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते छायांकित निसर्गानुभवसह दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!