केडीएमसीतील सफाई कर्मचा-यांच्या प्रश्नांवर
राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्यांची आयुक्तांसमवेत चर्चा
कल्याण – राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप के. हाथीबेड यांनी आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेस भेट देऊन महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांच्याशी महापालिकेत कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. या बैठकीत सफाई कर्मचा-यांच्या वारसांना लाड व पागे समितीच्या शिफारशींनुसार वारसा हक्काने नेमणूक देण्याबाबतबाबत चर्चा होवून पदांच्या उपलब्धतेनुसार व सेवाजेष्ठतेनुसार कर्मचा-यांचा वारसांना महापालिका सेवेत नेमणूक देण्यांत येईल, असे त्यांना सांगण्यात आले. तसेच सफाई कर्मचा-यांचा गटविमा काढण्याची सूचना सदस्यांनी केल्यावर त्यावर येत्या तीन महिन्यात गटविमा काढण्याचे मान्य करण्यात आले.
घरांची तातडीने दुरुस्ती करावी
दरम्यान हाथीबेड यांनी संतोषी माता मंदीर रोडवरील के.डी.एम.सी कर्मचा-यांची वसाहत असलेल्या १५ खोल्यांची तपासणी केली असता तेथील घरांची तातडीने दुरुस्त करण्याचा सुचना दिल्या. तसेच आवास योजनेच्या आढावा घेतांना वाल्मिकी आंबेडकर आवास योजने अंतर्गत कर्मचा-यांना घरे उपलब्ध करुन देणेबाबत विचार करावा. सफाई कर्मचा-यांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांची नियमित वैद्यकिय तपासणी करण्याचे देखील सांगीतले.
सैनिकांप्रमाणेच सफाई कामगारांचे काम
ज्या प्रमाणे सीमेवर सैनिक देशाची रक्षा करतात त्याप्रमाणे सफाई कामगार हे शहर स्वच्छ करुन एक प्रकारे देशाचे संरक्षण करीत असतात त्यामुळे सफाई कर्मचा-यांना मुलभूत सोयी पुरविण्यात येवून त्यांच्या समस्या सोडविण्यात याव्यात असे ते म्हणाले. महापालिकेच्या कामकाजासंदर्भात हाथीबेड यांनी समाधान व्यक्त केले. या बैठकित अखील महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेच्या राज्य कार्याध्यक्ष डॉ. रेखा बहेनवाल, इतर संघटनेचे पदाधिकारी, महापालिकेचे उपायुक्त विजय पगार, धनाजी तोरस्कर व अन्य अधिकारी उपस्थित होते.