पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांच निधन

पालघर : पालघर जिल्ह्यातील भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांचं हृदयविकाराच्या झटक्याने  मंगळवारी दिल्लीत  निधन झालं. ते 61 वर्षांचे होते. दिल्लीच्या राममोहन लोहिया रुग्णालयात चिंतामण वनगा यांची प्राणज्योत मालवली. चिंतामण वनगा तीन वेळा खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले होते.  महाराष्ट्रातील भाजप आदिवासी सेलचे प्रमुखही होते.

चिंतामण वनगा हे दिल्लीत होते सोमवारी  यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना दिल्लीच्या राममोहन लोहिया रूग्णालयात दाखल करण्यात आलं होत. आज सकाळी साडे दहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.  वनगा हे 1996 मध्ये  पहिल्यांदा खासदार झाले. त्यानंतर 1999 मध्ये ते डहाणू मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. तर 2014 मध्ये पालघर मतदारसंघात बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांना पराभूत करुन खासदार झाले. व्यवसायाने वकील असलेले चिंतामण वनगा यांनी 1990 ते 1996 या काळात भाजपचे ठाणे अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली होती. चिंतामण वनगा यांच्या रुपाने भाजपने पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजाचं नेतृत्त्व गमावलं आहे.

आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे ज्येष्ठ आणि समर्पित नेतृत्व हरपले :  मुख्यमंत्री 

पालघरचे खासदार अॅड. चिंतामण वनगा यांच्या निधनाने आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे ज्येष्ठ आणि समर्पित नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली  आहे. मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, वनवासी कल्याण केंद्र आणि प्रगती प्रतिष्ठानच्या माध्यमातून आदिवासींच्या उन्नतीसाठी श्री. वनगा गेली अनेक वर्षे निष्ठेने कार्यरत होते.  विधिमंडळ आणि संसदेमध्ये त्यांनी आदिवासी समुदायाच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविला होता. अत्यंत साधे राहणीमान असलेल्या वनगा यांच्या निधनाने एक निस्पृह आणि ध्येयवादी व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे.

आदिवासींचा समर्पित सेवक हरपला : रावसाहेब दानवे 

भारतीय जनता पार्टीचे खा. चिंतामण वनगा यांच्या निधनाने पक्षाने आदिवासी समाजाचा समर्पित सेवक आणि पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता गमावला आहे, अशी श्रद्धांजली भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी मंगळवारी अर्पण केली. खा. चिंतामण वनगा यांचे मंगळवारी नवी दिल्ली येथे सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना खा. रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, खा. चिंतामण वनगा यांनी प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पक्षाची बांधणी केली. सध्याच्या पालघर जिल्ह्यात आदिवासी वस्त्यांमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या दहशतीला न जुमानता त्यांनी भाजपाचे कार्यकर्ते जोडले. नम्र स्वभाव व साधेपणा या त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे पक्षाचा जनाधार वाढविण्यास मदत झाली. 1990 ते 1996 या कालावधीत ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष या नात्याने त्यांनी प्रभावी कार्य केले. भाजपाच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांची कारकिर्द चांगली होती. ते तीन वेळा लोकसभा सदस्य म्हणून तर एक वेळा विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले होते. लोकप्रतिनिधी म्हणून मिळालेल्या अधिकारांचा वापर त्यांनी आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी केला. ते उच्चशिक्षित होते आणि त्यांनी आपल्या ज्ञानाचा आणि पदाचा वापर कायम आदिवासी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी केला. त्यांच्या निधनाने पक्षाचे कधीही भरून येणार नाही असे नुकसान झाले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *