टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळांचा ६९ वा प्रजासत्ताक दिन अनोख्या कार्यक्रमाने साजरा
डोंबिवली : रिंग, बांबू, पतंग, रिबिन हया साधनयुक्त कवायती तर लेझीम, सूर्यनमस्कार, योगासने, मानवी मनोरे, एरोबिक्स, ज्युदो अशी लक्षवेधी प्रात्याक्षिक आणि आदिवासी, राजस्थानी, पंजाबी नृत्यांवर घेतलेला ठेका अशा अनोख्या कार्यक्रमाच्या सादरीकरणातून टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळांच्या शाळांचा ६९ वा प्रजासत्ताक दिन एकत्रित साजरा करण्यात आला.
टिळकनगर विद्यामंदिर, टिळकनगर कनिष्ठ महाविद्यालय, टिळकनगर बाल विद्यामनदिर व लोकमान्य गुरुकुल या टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळांनी एकत्रीतपणे प्रजासत्ताक दिन साजरा केला. शाळेचा माजी विद्यार्थी राष्ट्रपती पुरस्कार विजेता स्काऊट ऋतिक गायकवाड यांचे हस्ते ध्वजारोहण झाले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी गायलेल्या राष्ट्रगीत, ध्वजगीत व समूहगीतानंतर १ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांनी विविध कवायती व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. इ.६ वी, ७ वी च्या विद्यार्थ्यांचे मानवी मनोरे, इ.१ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांचे ज्युदो प्रात्यक्षिक , लोकमान्य गुरुकुल च्या रोप मल्लखांबानी सर्वांचे लक्ष वेधले. एन.सी.सी. च्या मुलांनी व मुलींनी तिरंग्याला मानवंदना देऊन दिमाखदार संचलन केले. ही प्रात्यक्षिके बसविणारया शिक्षकांना व ती सादर करणारया विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याध्यक्षा सविता टाकसाळे, कार्यवाह डॉ. महेश ठाकूर व आशीर्वाद बोंद्रे व इतर सदस्य उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजन शाळेच्या पर्यवेक्षिका लीना ओक मेथ्यू यांनी केले . मुख्याध्यापिका पुणतांबेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या भरगच्च उपस्थित उत्साहाने पार पडलेल्या या सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रज्ञा बापट, सचिन हमरे व माधव फाटक या शिक्षकांनी केले.