मुंबईत कुत्रे व मांजरांसाठी ३ ठिकाणी स्मशानभूमी उभारणार

मुंबई : शहरात कुत्रे व मांजर यासारख्या पाळीव प्राण्यांची संख्या मोठी आहे. हे पाळीव प्राणी घरातील एक सदस्यच असतात. वयोमानापरत्वे किंवा अन्य कारणांमुळे या प्राण्यांचा मृत्यु झाल्यास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणे सुकर व्हावे या दृष्टीने मुंबई महापालिकेच्यावतीने तीन ठिकाणी स्मशानभूमी उभारण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी याला मंजुरी दिली आहे. शहर भागात महालक्ष्मी, पूर्व उपनगरांमध्ये देवनार तर पश्चिम उपनगरात मालाड परिसरात स्मशानभूमी उभारण्याचे प्रस्तावित आहे. या तिन्ही स्मशानभूमी पर्यावरणपूरक पद्धतीने ‘सीएनजी’ या इंधनावर आधारित असणार आहेत अशी माहिती महापालिकेच्या देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. योगेश शेट्ये यांनी दिलीय.
सध्या महापालिका क्षेत्रात परळ परिसरात पाळीव प्राण्यांवर अंत्यसंस्कार केलं जाते. एका स्वयंसेवी संस्थेद्वारे हे चालवले जात आहे. तर भटक्या जनावरांच्या मृतदेहाच्या विल्हेवाट सदंर्भात कार्यवाही ही बोरिवली परिसरातल्या ‘कोरा केंद्र’ या स्वयंसेवी संस्थेद्वारे केली जाते. महापालिका क्षेत्रात कुत्रे व मांजरी या पाळीव प्राण्यांच्या मृतदेहावर त्यांच्या मालकांद्वारे वेगवेगळ्या प्रकारे अंत्यसंस्कार केले जातात. आरेाग्यदृष्टया हे योग्य असतील असे नाही त्यामुळेच महापालिकेने त्यांच्यासाठी तीन स्मशानभूमी उभारण्याचा निर्णय घेतलाय. ‘सार्वजनिक खाजगी भागीदारी’ तत्वावर या स्मशानभूमी उभारण्यात येणार असून. प्रत्येक स्मशानभूमीसाठी साधारणपणे २ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा खर्च तसेच स्मशानभूमीच्या मेंटनन्स व इंधनासाठी होणारा खर्च महापालिका करणार आहे. स्मशानभूमीमध्ये आवश्यक असणारे मनुष्यबळ व इतर आस्थापना खर्च ‘सार्वजनिक खाजगी भागीदारी’ अंतर्गत निवड होणा-या संस्थेद्वारे केला जाणे अपेक्षित आहे. साधारण निविदा प्रक्रिया जून २०१८ मध्ये होणे अपेक्षित असून सहा महिन्यात स्मशानभूमी उभारण्याचे प्रस्तावीत आहे. या स्मशानभूमींमध्ये कुत्रे, मांजरी यासारख्या पाळीव प्राण्यांचे मृतदेह आणि ‘ऍनिमल बर्थ कंट्रोल सेंटर’ येथे मृत होणा-या प्राण्यांच्या मृतदेहांवर मोफत अंतिमसंस्काराची सुविधा उपलब्ध होणार आहे.

६९ हजार २३९ कुत्र्यांचे निर्बिजीकरण

सन २०१२ च्या प्राणी गणनेनुसार मुंबई महापालिका क्षेत्रात ३३ हजार ५७२ कुत्रे आहेत. तसेच सन २०१४ मध्ये महापालिकेद्वारे करण्यात आलेल्या गणनेनुसार मनपा क्षेत्रात ९५ हजार १७२ भटके कुत्रे आहेत. यापैकी ६९ हजार २३९ कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले होते. हे निर्बिजीकरण ‘ऍनीमल बर्थ कंट्रोल प्रोग्रॅम’ अंतर्गत करण्यात आले होते. सध्या महापालिका क्षेत्रात तीनशे पेक्षा अधिक पशुवैद्यकीय दवाखाने असून परळ परिसरात एक रुग्णालय आहे. महापालिकेद्वारे सुद्धा पाळीव प्राण्यांसाठीचा स्वतंत्र दवाखाना खार परिसरात कार्यरत आहे, अशीही माहिती महापालिकेच्या देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. योगेश शेट्ये यांनी दिलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *