सोशल साईट्सवर वैयक्तिक माहिती देतांना सावधानता बाळगा : सायबर विधी तज्ज्ञ राजस पिंगळे
ठाणे पोलिसांची लवकरच अद्ययावत सोशल मिडीया लॅब

ठाणे : देशात माहिती संरक्षण कायदा ( डाटा प्रोटेक्शन लॉ) आल्यानंतर सायबर सुरक्षेच्या दृष्टीने अधिक परिणामकारक पावलं उचलली जाऊ शकतील व अशा गुन्ह्यांना आळाही बसेल, परंतू तोपर्यंत एक नागरिक म्हणून आपण विविध मोबाईल अँप्स आणि वेबसाईटवर वैयक्तिक माहिती देतांना तिचा गैरवापर होणार नाही याची खात्री असेल तरच माहिती द्यावी असे प्रतिपादन सायबर गुन्हे अधिवक्ता अॅड राजस पिंगळे यांनी केले. याप्रसंगी सह पोलीस आयुक्त मधुकर पांडे, पोलीस उपायुक्त (आर्थिक गुन्हे आणि सायबर गुन्हे) डॉ संदीप भाजीभाकरे  तसेच कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ गणेश मुळे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. ठाणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे तसेच इतर पत्रकार, छायाचित्रकार, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

महाराष्ट्र सायबरचे प्रमुख विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांच्या संकल्पनेतून ट्रान्सफोर्मिंग महाराष्ट्र अंर्तगत पत्रकार आणि माध्यमांसाठी सायबर जाणीव जागृती उपक्रम सुरु आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयातील सायबर कक्ष आणि जिल्हा माहिती कार्यालय ठाणे यांच्या वतीने आज पार पडलेल्या या कार्यशाळेत पत्रकारांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. तसेच सायबर कायद्याच्या उपयुक्ततेविषयी अधिक माहितीही घेतली. अॅड राजस पिंगळे यांनी सायबर गुन्हे कसे घडतात याची उदाहरणांसह माहिती दिली. ते म्हणाले की, इंटरनेट स्वस्त आणि सहज उपलब्ध झाले आहे. त्यामुळे आपण उत्साहाच्या भरात आपली वैयक्तिक माहिती कुठे ना कुठे मोबाईलवर अँप्स आणि वेबसाईटच्या माध्यमातून टाकत असतो. पण या माहितीचा दुरुपयोग होऊ शकतो. कुणी कितीही सांगितले तरी महाजालातील माहिती पूर्णत: सुरक्षित असतेच असे नव्हे. आता  इंटरनेट ऑफ थिंग्स( IOT) चा जमाना आहे. अनेक घरगुती वापराच्या वस्तूंमध्ये इंटरनेटची सोय आहे . याठिकाणी देखील काही माहिती टाकतांना आपण काळजी घेतली पाहिजे. आज १७०० पेक्षा जास्त क्रिप्टो करन्सी बाजारात आहेत. ती प्रचंड महाग असली तरी अनेकदा धोक्याच्या सूचना देऊनही श्रीमंत लोक यात गुंतवणूक करुन स्वत:चे नुकसान करून घेत आहेत, यापासून दूर राहिले पाहिजे. सोशल मिडीयावर आलेली फ्रेंड रिक्वेस्ट मान्य करण्यापूर्वी आपण पुरेपूर विचार केला पाहिजे.  काही दिवसांपासून बँकेच्या एटीएम्समधून फसवणूक करून पैसे काढण्याच्या घटना घडत आहेत.यामध्ये ग्राहकाने सावधानता बाळगायची आहे परंतू बँकेची देखील सुरक्षेच्या दृष्टीने मोठी जबाबदारी आहे, ग्राहकाची चूक नसेल तर नियमाप्रमाणे विशिष्ट दिवसांत त्याला पैसे मिळणे आवश्यक आहे असेही राजस पिंगळे यांनी सांगितले.

सोशल मिडीया लॅब स्थापणार

सह पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी सायबरविषयक जागृतीत पत्रकारांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन केले. पोलीस उपायुक्त डॉ संदीप भाजीभाकरे यांनी सायबर जाणीव जागृतीसाठी शाळा  महाविद्यालयातून कसे प्रयत्न केले जात आहेत ते सांगितले. आर्थिक आणि सायबर गुन्हे कसे केले जातात याची उदाहरणे देतांना त्यांनी नुकत्याच झालेल्या विवाहस्थळांच्या वेबसाईटवरील फसवणूकीची प्रकरणे, इंटरनेटवरील माहितीचा आधार घेऊन केलेले गुन्हे यांची उदाहरणे दिली. सायबर गुन्हे करणारे लोक कसे हुशारीने आणि चलाखीने लोकांना फसवितात त्यापासून सावध कसे राहायचे याच्या टिप्स त्यांनी दिल्या. तसेच सोशल मिडीयाच्या अनुषंगाने देखील निरीक्षण आणि विश्लेषण करणारी एक अद्ययावत लॅब सुरु करणार असल्याचे सांगितले. प्रारंभी कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ गणेश मुळे यांनी ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र अंतर्गत सायबर जागृती कार्यक्रमाची का आवश्यकता आहे ते सांगितले. माध्यमांनी यात जबाबदारीची भूमिका घेणे गरजेचे असून सर्वसामान्यांपर्यंत सायबर गुन्ह्यांबाबत अधिकाधिक माहिती पोहचवून लोकांना सज्ञान करावे असे ते म्हणाले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अनिरुध्द अष्टपुत्रे यांनी आभार मानले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर संजय सावंत यांनी पत्रकारांना प्रत्यक्ष सायबर प्रयोगशाळेचे काम कसे चालते ते दाखविले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *