केडीएमसीच्या महापौरांना न्यायालयाचा दिलासा
कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय आज मुंबई उच्च न्यायालयाने रद्द ठरवित देवळेकर यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले. त्यामुळे देवळेकर यांना मोठा दिलासा मिळाला असून महापौरपद अबाधित राहिलय.
अडीच वर्षापूर्वी झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक देवळेकर हे प्रभाग क्र १६ मधून नगरसेवक म्हणून निवडून आले. मागील दोन निवडणूकीत दोन वेगवेगळी जात प्रमाणपत्र जोडल्याने त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार अर्जुन म्हात्रे यांनी जात वैधता प्रमाणपत्र अवैध असल्याच्या कारणावरून कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिलं होते. त्यावेळी न्यायालयाने देवळेकर यांचे निवड रद्द ठरवली होती. या निर्णयाविरोधात देवळेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज झालेल्या सुनावणीत न्यायमुर्ती शालिनी फणसाळकर यांनी कल्याण न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवत देवळेकर यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले.