शेतजमिनी कवडीमोल भावात लाटण्याचा प्रयत्न : शेतक-याने थोपटले रिलायन्स विरोधात दंड
भिवंडी : रिलायंस गॅस कंपनीकडून नागोठणे ते दहेज असे पाईपलाईन टाकण्याचे कामकाज सुरु असून यासाठी तालुक्यातील शेतक-यांच्या शेकडो एकर जमिनी राज्यशासनाने परस्पर संपादीत करून ७ /१२ उताऱ्यावर इतर हक्कांमध्ये रिलायंस कंपनीच्या नावाची नोंद केली आहे. मात्र शेतक-यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळत नसल्याने शेतकयांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.या विरोधात पडघालगतच्या अर्जुनली गावातील शेतकरी इरफान पटेल यांनी रिलायंस कंपनीविरोधात दंड थोपटले असून, आपल्या जमिनीचा योग्य मोबदला न दिल्यास शेतजमिनीत पाइपलाईनचे काम करून देणार नाही. तरी सुध्दा रिलायंस कंपनीने जबरदस्ती केल्यास कुटुंबियांसह आत्मदहन करू असा इशारा दिलाय.
भिवंडी तालुक्यातील भादाणे, अर्जुनली, पडघा, कुरुंद, दळेपाडा, घोलबाव, खालींग, लाप, किरवली, दाभाड, जांभिवली, गोंदरोली पाडा,खरीवली,दलोंडे, दिघाशी,रवदी या गावांच्या हद्दीतून दहेज ते नागोठणे इथेन पाईपलाईन प्रकल्प उभारला जात आहे.रिलायन्स गॅस ट्रान्स्पोर्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.या कंपनीमार्फत टाकण्यात येत असलेल्या पाईप लाईनसाठी ३० मीटर रुंद शेतजमीन अधिग्रहित करण्यात येत आहे.विविध विकास कामांसाठी शेतक-यांच्या जमिनी सरकारी भावापेक्षा पाच ते दहा पट अधिक रकमेने घेण्याचे स्पष्ट निर्देश असताना कंपनीचे प्रतिनिधी स्थानिक राजकीय मंडळींना मध्यस्थ नेमून स्थानिक शेतक-यांना भूलथापा देवून कवडीमोल भावात खरेदी करून येथील शेतक-यांची फसवणूक करीत आहेत असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.कंपनी एजंट सुरवातीला शेतक-यांशी गोड बोलून थोडी रक्कम दिली जात असून त्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ करून स्थानिक पोलिसांच्या बंदोबस्तात या जमिनींमध्ये शेतक-यांवर दबाव टाकून पाईपलाईन टाकण्याचे काम केले जात आहे.अर्जुनलीचे शेतकरी इरफान पटेल यांची या पाईपलाईनमुळे तब्बल ६० गुंठे शेतजमीन बाधित झाली असून मुंबई नाशिक महामार्गालगतच्या जागेवर इरफान पटेल यांचे १९९० पासून शालिमार हॉटेल सुरु होते.तर गावालगतच्या एक एकर जमिनीतील शेततळ्यात मत्स्यपालन करीत होते.त्या जमिनी या प्रकल्पामध्ये बाधित झाल्याने सुरवातीला कंपनीने नुकसान भरपाई दिली व त्यानंतर शालिमार हॉटेल तोडून टाकले तर शेततळे उध्वस्थ केले.मात्र नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करीत आहेत.त्यामुळे पाईप लाईन टाकण्यास आलेल्या रिलायंस कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पिटाळून लावले असून काम ठप्प पाडले आहे.