अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांच्या नऊ पुस्तकांचे होणार एकाचवेळी प्रकाशन : २० जानेवारीला साहित्य संध्याचे आयोजन 

डोंबिवली : एखादया पुस्तकाचे लेखन करून प्रकाशन करणे ही प्रदीर्घ प्रक्रिया. विषय निवड, मांडणी, त्यानंतर संपादन आणि प्रकाशन अशी प्रदीर्घ प्रक्रिया यासाठी असते.मात्र लेखक, अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी नऊ विविध पुस्तकांचे लेखन एकाचवेळी केले असून या सर्व पुस्तकांचे प्रकाशन २० जानेवारीला साहित्य संध्या या उपक्रमाअंतर्गत करण्यात येणार आहे. सर्वेश सभागृह येथे हा सोहळा होणार आहे. संध्याकाळी ६ वाजता लेखक श्रीकांत बोजेवार यांच्याहस्ते या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. रघुलीला एंटरप्रायझेस, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट, मधुमालती एंटरप्रायझेस आणि दत्तनगर उत्कर्ष मंडळ या चार संस्थांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या सोहळ्यासाठी सुधीर जोगळेकर आणि माधव जोशी निमंत्रकाच्या भूमिकेमध्ये असणार आहेत.

थेंब थेंब आयुष्य ( कविता संग्रह )’, वही आयुष्याची ( कविता संग्रह ), मनरंगी ( कविता संग्रह ) , गुंतवणूक तुमची माझी ( लेख संग्रह ), मनातलं मनातच या नवीन पुस्तकांबरोबरच गुंतवणूक पंचायतन ( चौदावी आव्रुत्ती ) , मार्केट मेकर्स ( तिसरी आव्रुत्ती ) , मला भावलेले गुलजार ( दुसरी आव्रुत्ती ) ,मल्हार मनाचा ( दुसरी आवृत्ती) या पुस्तकांचे यावेळी प्रकाशन होणार आहे.

एनएसडीएलमध्ये उपाध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळत असतानाच एक लेखक म्हणून टिळक यांनी स्वतःची वेगळी छबी निर्माण केली आहे. हा संपूर्ण प्रवास यानिमित्ताने मुलाखतीच्या माध्यमातून उलगडणार असून सौरभ सोहोनी टिळक यांच्याशी सुसंवाद साधणार आहे.याचबरोबर निखिलेश सोमण आणि आदिती जोगळेकर- हर्डीकर टिळक यांच्या पुस्तकांचे विश्लेषण करणार आहेत.

याचबरोबर संकेत ओक, मधुरा ओक, निलय घैसास, प्राजक्ता वैशंपायन हे चंद्रशेखर टिळक यांच्या कथा आणि कवितांचे अभिवाचन करणार आहेत. या सोहळ्याला सर्वांना प्रवेश खुला असणार असून अधिकाधिक रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!