कृष्णकुंज परिसर हॉकर्स झोन, मातोश्री नो हॉकर्स झोन
मुंबई : बेकायदेशीर बसणा-या फेरीवाल्यांविरोधात मनसेने दंड थोपटले असतानाच आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या कुष्णकुंज या निवासस्थानाजवळील परिसर हॉकर्स झोन करण्यात आलाय. मात्र शिवसेना पक्षप्रमख उध्दव ठाकरे यांचा कलानगर परिसर नो हॉकर्स झोन करण्यात आलाय. त्यामुळे दोन्ही ठाकरेंच्या घरासमोरील हॉकर्स व नो हॉकर्स झोन चांगलाच पेटण्याची शक्यता आहे.
शिवाजी पार्कातील केळुस्कर रोडवर असलेल्या राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानाबाहेर १० फेरीवाल्यांना बसण्यास पालिकेने मंजुरी दिली आहे. मात्र केळुस्कर आणि राऊत मार्गा फेरीवाला क्षेत्रात बसत नसल्याचे मनसे पदाधिका-यांचे म्हणणे आहे. तसेच महापालिकेच्या यादीनुसार मनसेचे मुख्यालय असलेल्या माटुंगा मधील पद्माबाई ठक्कर मार्गावरील राजगड कार्यालयाबाहेर १०० फेरीवाले बसणार आहेत. राज ठाकरेंच्या निवासस्थाना समोरील परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास मंजुरी देण्यात आल्याने मनसेचे पदाधिकारी संतापले आहेत बुधवारी मनसे पदाधिका-यांची बैठक पार पडली. यासंदर्भात मनसे पदाधिकारी आयुक्तांची भेट घेणार आहेत.
विशेष म्हणजे पालिकेतील सत्ताधारी असलेलले शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या कलानगरच्या मातोश्री बंगल्याचा परिसर मात्र नो हॉकर्स झोनमध्ये टाकण्यात आला आहे. यामुळे मनसेत संतापाची लाट पसरली आहे. नव्या धोरणानुसार दादरमधील शिवसेना भवनासमोर १००, दादरमधील मुंबई भाजप कार्यालय असलेल्या फाळके रोडवर ३१० फेरीवाल्यांना बसण्यास संमती देण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेचे हॉकर्स आणि नो हॉकर्स झोन चांगलंच वादात सापडण्याची शक्यता आहे.