अनाथ मुलांना एक टक्के आरक्षण : मंत्रीमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय
मुंबई : राज्यातील अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात एक टक्के समांतर आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. अनाथ मुलांचे पुनर्वसन आणि त्यांचे भवितव्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला.
अनाथ मुलांना त्यांचा संस्थेतील कालावधी संपल्यानंतर खुल्या जगात वावरताना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागते. विशेषतः त्यांचा प्रवर्ग निश्चित नसल्याने शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सवलती आणि लाभांपासून वंचित राहावे लागत होते. अनाथ मुलांच्या या समस्या ध्यानात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आरक्षणाचा लाभ मिळवून देऊ, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात आला आणि त्याला मंजुरी देण्यात आली. या आरक्षणामुळे अनाथ मुलांच्या पुनर्वसनाला आणखी बळकटी मिळणार आहे.