शिवसेनेच्या मंजुषा जाधव अध्यक्षपदी तर राकाँपाचे सुभाष पवार उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेवर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच सत्ता स्थापन झालीय. तब्बल ५५ वर्षानंतर ठाणे जिल्हा परिषदेवर परिवर्तन घडलय. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या मंजुषा जाधव तर उपाध्यक्ष पदी सुभाष पवार यांची बिनविरोध निवड झालीय. मंजुषा जाधव या ठाणे जिल्हा परिषदेच्या चौथ्या महिला अध्यक्षा ठरल्या आहेत. केंद्रात व राज्यात शिवसेना व भाजपची सत्ता असली तरी सुध्दा ठाणे जिल्हा परिषदेवर शिवसेनेने राष्ट्रवादीशी हातमिळवणी करीत भाजपला सत्तेपासून लांब ठेवलय.

ठाणे जिल्हा परिषदेच्या ५३ गटांची निवडणूक डिसेंबरमध्ये पार पडली होती. त्यामध्ये शिवसेनेला सर्वाधिक २६, भाजपला १५, राष्ट्रवादीला १० आणि अपक्ष तर काँग्रेसची एक सदस्या बिनविरोध निवडून आली होती. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पटकावण्यासाठी भाजपने जोर लावला होता मात्र शिवसेनेने त्यांना सत्तेपासून लांब ठेवले. ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी मंजुषा चंद्रकांत जाधव, नंदा उघडा तर उपाध्यक्षपदासाठी सुभाष पवार, अशोक घरत यांनी उमेदवारी अर्ज सादर केले होते. मात्र उघडा आणि घरत यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने जाधव आणि पवार यांची बिनविरोध निवड झालीय. उपविभागीय अधिकारी तथा पिठासन अधिकारी म्हणून सुदाम परदेशी यांनी काम पाहिले. ठाणे जिल्हा परिषदेवर भगवा फडकल्याने शिवसैनिकांनी  ढोलताशांच्या गजरात आणि फटाके लावून जल्लोष साजरा केला. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना उपनेते अनंत तरे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, सुभाष भोईर, कल्याणचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, महापौर मीनाक्षी शिंदे, जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे, परिवहन सभापती अनिल भोर, महापालिकेतील सभागृहनेते नरेश म्हस्के, कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार गोटीराम पवार, माजी सिडको चेअरमन प्रमोद हिंदुराव  आदी उपस्थित होते.

भाजपला ठेवलं सत्तेपासून लांब

ठाणे जिल्हा परिषद व मुरबाड पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली होती. त्यावेळी मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शिवसेनेचा एकमेव सदस्य असूनही राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला उपसभापती पद दिले होते. त्याचीच परतफेड करीत शिवसेनेने सुभाष पवार यांना ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद दिलं आहे. सुभाष पवार हे माजी आमदार गोटीराम पवार यांचे पुत्र आहेत ते मुरबाड तालुक्यातील कुडवली गटातून विजयी झाले आहेत. जिल्हा पातळीवर सत्तेत मोठे पद मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. ठाणे जिल्हयात भाजपला शह देण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने हातमिळवणी करीत भाजपला सत्तेपासून लांब ठेवलय.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!