सरकारी वाहन भंगारात, आपत्कालीन स्थितीत अधिका-यांची खासगी वाहनांवरच भिस्त

महाडच्या सरकारी कार्यालयांना कुणी वाहन देईल का वाहन

महाड / निलेश पवार : महाड मधील तहसील कार्यालय असो वा महामार्ग पोलीस अशा तालुक्यातील महत्वाच्या शासकीय कार्यालयाची वाहने सध्या भंगारात पडलीयत. तालुक्यातील विविध कामांसाठी अथवा आपत्कालीन काळात इथल्या अधिका-यांना वाहन नसल्याने कसे जावे असा प्रश्न पडतो अशावेळी खासगी वाहनांवरच त्यांना अवलंबून राहावे लागते.

महाड महसूल कार्यालयाला असलेली सुमो जीप नादुरुस्त होवून भंगारात पडली आहे. त्यामुळे तहसीलदार, नायब तहसीलदार, यांना खाजगी वाहनाचा किंवा स्वतच्या दुचाकीवरून कामानिमित्त जावे लागत आहे. महाड पंचायत समिती मध्ये असलेली बोलेरो जीप देखील बंद अवस्थेत आहे. महाड तालुक्यातील जवळपास ३२४ गावांना भेट देण्यासाठी वाहन तर हवेच. पंचायत समितीच तर थेट संबंध तालुक्यातील ग्रामीण जीवनाशी येतो. असे असताना देखील गेली कांही दिवसापासून गट विकास अधिकारी यांचे वाहन बंद पडले आहे. तालुक्यातील शाळा, ग्रामपंचायत, विविध ग्रामीण शासकीय उपक्रम या करिता गट विकास अधिकारी यांना तालुक्यातील गावातून जाणे गरजेचे असते. शिवाय गावांमधील पाणी पुरवठा, दिवाबत्ती, आदी कामांवर देखभाल आणि पाहणी करण्याचे काम देखील गट विकास अधिकारी करत असतात.

महाड जवळील महामार्ग पोलीस पथकाच्या वाहनाची तर दुरवस्था गेली ६ महिन्यापासून आहे. मुळातच भंगार होत गेलेल्या वाहनाकडे देखभाल होत नसल्याने हि वाहने आता बंद पडली आहेत. महत्वाच्या महामार्ग पोलीस पथकाकडेच वाहन नसल्याने अपघात झाल्यास पोहोचायचे कसे असा प्रश्न पोलिसांपुढे निर्माण झाला आहे. इंदापूर ते कशेडी या जवळपास तीस किमी अंतरासाठी हे पथक काम करत आहे. या पथकाला देण्यात आलेली दुचाकी देखील आणल्यापासून बंद अवस्थेत आहे. या पोलिसांना स्वतच्या दुचाकीने अपघात स्थळी जावे लागत आहे. मात्र वाहनांना शासनाकडून देखभाल निधी वेळेवर मिळत नसल्याने हि अवस्था निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

महाड तालुका हा राजकीय, धार्मिक, दृष्ट्या संवेदनशील तालुका आहे. महाडमधील चवदारतळे, किल्ले रायगड यामुळे महाड तालुक्यात प्रतिदिन हजारो पर्यटक आणि महत्वाच्या व्यक्ती येत असतात. रायगड आणि महाड मध्ये यानिमित्त राज्य आणि देशपातळीवर काम करणाऱ्या अतिमहत्वाच्या व्यक्ती कायम येत असतात. मंत्र्यांचे दौरे आणि वरिष्ठ अधिकारी देखील याठिकाणी येत असतात. यामुळे या दोन्ही ठिकानी जाणे तेथील आढावा घेणे आदी कामाकरिता वाहनाची गरज आहे. महाड तालुका हा डोंगरदऱ्यात वसलेला आहे. तालुक्याचे क्षेत्र देखील मोठे आहे यामुळे वाहन गरजेचे आहे मात्र गेली अनेक दिवसापासून वाहनाची बिकट अवस्था झाली आहे.  शासकीय वाहनांना देखभाल दुरुस्ती वेळेवर होत नाही. देखभाल दुरुस्तीसाठी वेळेवर पैसे देखील मिळत नाही. या वाहनांना लागणारे इंधन उसनवारीवर मिळते मात्र अनेक महिन्यानंतरही इंधनाचे पैसे पेट्रोल पंप चालकांना मिळत नाही. म्हणून अनेकदा हि वाहने इंधनाविना उभी राहतात.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!