मुंबई, : पुणे जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थानच्या एकूण 148.37 कोटींच्या विकास आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आली.
यावेळी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थान समितीचे अध्यक्ष आमदार दिलीप वळसे-पाटील, आमदार सुरेश गोऱ्हे, पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, ग्रामविकास विभागाचे सचिव आसिम गुप्ता, वन विभागाचे सचिव विकास खारगे, पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले, एक सारख्या कामाचे योग्य विभाजन करुन कामाचे नियोजन करावे. हा विकास आराखडा चार भागात विभागला असून यामध्ये पायरी मार्ग ते भीमाशंकर मंदिर परिसर, भीमा नदी उगमस्थान व परिसर, महादेव वन, बस स्टॅण्ड परिसर आदी भागांचा विकास या नियोजित आराखड्यात करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी राव यांनी आराखड्याचे सादरीकरण केले.