ठाणे जिल्ह्यात २८ जानेवारीला एक दिवसाची राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम : २ लाख बालकांना देणार लसीकरण
१५ हजार आरोग्य कर्मचारी सहभागी होणार
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ५ तालुके आणि ६ महानगरपालिका क्षेत्रात रविवार २८ जानेवारी रोजी एक दिवसाची राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम होणार असून ही मोहीम शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झालीय. आज जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भातील आढावा अप्पर जिल्हाधिकारी अनिल पवार यांनी घेतला तसेच मार्गदर्शन केले. प्रारंभी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बी एस सोनावणे यांनी मोहिमेविषयी सादरीकरण केले. या मोहिमेत जिल्हयातील सुमारे २ लाख बालकांना पोलिओ लस देण्यात येणार आहे.
या मोहिमेत विशेषत: ० ते ५ वयोगटातील बालकांना पोलिओ लस देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील १ लाख ५७ हजार ७१६ तर शहरी भागातील ६१ हजार ९२८ बालकांना लस दिली जाईल. एकूण २ लाख ९२ हजार १२७ बालकांना बॉयोव्हालंट पोलिओ लस दिली जाईल. यासाठी १ हजार ८३२ बुथ्स उभारण्यात येत असून ३४५ मोबाईल पथके असतील. सुमारे १५ हजार कर्मचारी या मोहिमेत भाग घेणार आहेत. ६ लाखापेक्षा जास्त घरांना हि पथके भेट देणार आहेत. रेल्वे स्थानके, बस स्थानके, नाके या सर्व ठिकाणी पोलिओ लस देण्याची व्यवस्था केली आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ठाणे अध्यक्षांनी देखील यावेळी त्यांच्या सदस्य डॉक्टर्सच्या माध्यमातून रुग्णांना या मोहिमेविषयी माहिती देणार असल्याचे सांगितले. गेल्या तीन वर्षांत पोलिओ निर्मूलनात महाराष्ट्राने लक्षणीय कामगिरी केली आहे. २००६ मध्ये भिवंडी येथे १ रुग्ण तर २००७ मध्ये ठाणे ग्रामीण भागात १ रुग्ण आढळून आला होता. २००८ मध्येही भिवंडीत १ रुग्ण आढळला. जानेवारी २०११ नंतर मात्र संपूर्ण देशात एकही पोलिओ रुग्ण आढळला नाही. २० तारखेपासून या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे तालुका पातळीवर प्रशिक्षण सुरु होणार आहे. यात अंगणवाडी सेविका, आशा देखील असतील. आजच्या बैठकीस सर्व पालिकांचे वैद्यकीय अधिकारी देखील उपस्थित होते.