केडीएमसी ` लुटारू महानगरपालिका ` बिल्डर संघटनेने लावले बॅनर : 

खुल्या जागेवर सर्वाधिक कर असणारी महापालिका

कल्याण  :- कल्याण डोंबिवली महापालिका ही सर्वात अधिक कर आकारणारी महापालिका असल्याने या निषेधार्थ एमसीएचआय या बिल्डर संघटनेने लुटारू महापालिका म्हणून शहरात बॅनर लावले आहेत. महापालिकेचा जिझिया कर विरोधात शुक्रवार १२ जानेवारीला एमसीएचआय केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा काढणार आहे. याचे पडसाद  आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत उमटले. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा विषय कॅबिनेटच्या बैठकीत मांडला. त्यावेळी ओपन लॅण्डचा विषय तातडीने मार्गी लावा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना आदेश दिले आहेत.

ठाणे व पुणे महानगरपालिकेत खुल्या जमिनीवर वार्षिक दर ६० रूपये प्रति चौ मीटर आकारण्यात येतो. इतर महापालिकेत कमीत कमी २० रूपये आणि जास्तीत जास्त ६० रूपये दर आहे.  मात्र केडीएमसीत कमीत कमी ३०० आणि जास्तीत जास्त २३०० आहे. त्यामुळे केडीएमसीचा सरासरी दर १४०० रूपये प्रति चौ मी होता. असे एमसीएचआयचे उपाध्यक्ष रवी पाटील यांनी सांगितल. ठाणे घोडबंदर येथे प्लॅटचा दर १० हजार चौरस फूट पुणे बाणेर येथे ७ हजार तर कल्याण गंधारे ५ हजार चौ फूट आहे. केडीएमसीत प्लॅट विक्रीचा दर सर्वात कमी मात्र खुल्या जागेवरील कर सुमारे २००० टक्के अधिक असल्याचे  पाटील यांचे म्हणणे आहे. तसेच पालिकेने ओपन लॅण्ड टॅक्सची ४१८ कोटी थकबाकी दाखवली आहे मात्र प्रत्यक्षात ही ६० ते ७० कोटी आहे पालिकेची लिस्ट ही दिशाभूल करणारी असल्याचा आरोप पाटील यांनी केलाय.

 अधिकृत बॅनर काढण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांचा दबाव
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत हे एमसीएचआयने लावलेले बॅनर काढण्यासाठी ठेकेदारांवर दबाव टाकत असल्याचा आरोप रवि पाटील यांनी केलाय. मात्र हे बॅनर लावण्यासाठी पालिकेची अधिकृत परवानगी घेतली असून, अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना परवानगी घेतलेले बॅनर काढण्याचा अधिकार कोणी दिला ? असा सवालही पाटील यांनी उपस्थित केलाय. पालिकेला हे आक्षेपाई वाटत असेल तर पालिकेने एमसीएचआयला नोटिस बजावावी. आम्ही त्याचे कायदेशीर उत्तर देऊ असेही पाटील यांनी सांगितले.

      

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *