विकासात कल्याणला अधिक महत्व, डोंबिवलीला स्मार्ट बनविण्यासाठी पत्रकारांचा पाठींबा हवाय
पत्रकार दिनाच्या व्यासपीठावर रमेश म्हात्रे यांचे प्रतिपादन
डोंबिवली : स्मार्ट सिटीच्या विकास कामांमध्ये डोंबिवलीपेक्षा कल्याण शहराला अधिक महत्व दिलं जात आहे. त्यासाठी डोंबिवलीचे लोकप्रतिनिधी एकत्रीतपणे सभागृहात आवाज उठवित आहेत. मात्र डोंबिवली स्मार्ट बनविण्यासाठी पत्रकारांचा पाठींबा हवाय असे प्रतिपादन केडीएमसीचे स्थायी समितीचे सभापती रमेश म्हात्रे यांनी डोंबिवलीत पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात केलं.
६ जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. गेल्या दहा वर्षापासून पत्रकार बापू वैद्य आणि सहकारी पत्रकार दिन साजरा करतात. शनिवारी गणेश मंदिरातील विनायक सभागृहात पत्रकार दिन साजरा करण्यात आला. त्या कार्यक्रमात म्हात्रे हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी विकासाबाबतीत डोंबिवलीला डावललं जात असल्याची खदखद व्यक्त केली. विकास कामांत डोंबिवलीकडे पाठ फिरवणा-या अधिका-यांवर कारवाईचीही मागणी त्यांनी केली. शहराला स्मार्ट करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु असताना पत्रकारांचा यात मोठा हातभार लागला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सभागृह नेते राजेश मोरे म्हणाले की, जे चुकीचे आहे त्यावर पत्रकारांनी परखडपणे प्रहार केला पाहिजे त्यासाठी कुणाचीही गय करता कामा नये. पत्रकारांनी परखडपणे लिहलं पाहिजे. पण जेथं चांगलं काम आहे तेथं चांगलच लिहलं पाहिजे. पत्रकार हा कुठल्या पक्षाला बांधील असता कामा नये असेही मोरे म्हणाले. यावेळी लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार महेंद्र सुके, प्रहारचे उपसंपादक मंगेश तावडे, विरोधी पक्षनेते मंदार हळबे, बसपाचे नेते दयानंद किरतकर, मनसेचे शहर अध्यक्ष मनेाज घरत आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.
डोंबिवलीतील पत्रकारांनी बाळशास्त्री जांभेकरांचा वारसा जपलाय : महेंद्र सुके
सांस्कृतीक कार्यक्रमाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणा-या डोंबिवलीत आजही सामाजिक बांधिलकी दिसून येते. इथल्या पत्रकारांकडून सामाजिक कामाची दाखल घेतली जाते. आता पत्रकारांची जबाबदारी वाढली आहे. डोंबिवलीतील पत्रकारांचे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा जपण्याचे कार्य सुरु आहे असे प्रतिपादन लोकमतचे फिचर एडीटर महेंद्र सुखे यांनी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात बोलताना केले. पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात पत्रकारांच्या कामाची दखल घेऊन त्यांना पुरस्काराने गौरविण्यात आल्याने त्याचेही सुके यांनी कौतूक केल.
पत्रकारांचा सन्मान
वयाच्या ७५ व्या वर्षीही पत्रकार म्हणून कार्यरत असणाऱ्या महेंद्रभाई ठक्कर यांना डोंबिवली पत्रकार संघाचे संस्थापक कै. श्रीकांत टोळ पुरस्कार, शोध पत्रिकारिता करणारे व निर्भिड पत्रकार म्हणून प्रसिद्ध असणारे पत्रकार भगवान मंडलिक यांना दर्पणकार बाळशात्री जांभेकर पुरस्कार, जेष्ठ पत्रकार प्रशांत जोशी यांना डोंबिवलीतल पाहिले साप्ताहिक ‘अंकुश’चे संस्थापक कै. चंद्रकांत गोरे पुरस्कार, तरुण पत्रकार शंकर जाधव यांना कै. नरसिंह खानोलकर पुरस्कार, महिला पत्रकार जान्हवी मोर्य यांना कै. सुरेंद्र बाजपेई पुरस्कार देण्यात आला. मानचिन्ह शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच सिनेसृष्टीत अनेक चित्रपटात वेगवेगळी भूमिका बजावणारे जेष्ठ पत्रकार अजय निक्ते यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. तसेच पत्रकार सारिका शिंदे यांनाही जर्नालिस्टस युनियन ऑफ महाराष्ट्रच्या यांच्यावतीने पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांनी वास्तव समाजिक परिस्थितीचे पडखड भाष्य करणारी `गुलाम` ही कविता सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. शिरीष देशपांडे आणि अॅड. प्रकाश सिनकर यांनी केले. प्रस्तावना जेष्ठ पत्रकार बापू वैद्य यांनी तर आभार जेष्ठ पत्रकार नरेंद्र थोरवडे यांनी मानले.
————-
असा रंगला कार्यक्रम