आयडील रोड बिल्डरचे संस्थापक दत्तात्रय म्हैसकर यांचे निधन
डोंबिवली : ‘आयडियल रोड बिल्डर’चे संस्थापक व प्रसिध्द उद्योजक दत्तात्रेय म्हैसकर यांचे वयाच्या ८० व्या वर्षी डोंबिवलीतील राहत्या घरी रात्री आठच्या सुमारास निधन झाले. गेल्या पाच महिन्यांपासून ते श्वसनाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुधा, वीरेंद्र व जयेंद्र ही दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रात्री उशिरा डोंबिवलीतील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दत्तात्रेय म्हैसकर यांचा जन्म १५ सप्टेंबर १९३८ रोजी डोंबिवलीत झाला. डोंबिवली पश्चिमेतील महात्मा गांधी रोडवर पु भावे सभागृहासमोरच त्यांचा बंगला आहे. ते मुंबईत राहावयास गेले असले तरी शनिवारी रविवारी ते डोंबिवलीत येत असत. उत्तम दर्जाचे रस्ते बनविण्याचे काम त्यांची कंपनी करते. युती सरकारच्या काळातील मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे ची निर्मिती ही त्यांच्या कंपनीने केली. हीच त्यांची प्रमुख ओळख आहे. राज्य सरकारला ९५० कोटी रुपयांचा धनादेश प्रदान केला होता . एका मराठी उद्योजकाने एवढी मोठी रक्कम राज्य सरकारला दिल्याचे त्यांचे सर्वत्रच कौतुक झाले होते. महाराष्ट्रासह दिल्ली गुजरात राजस्थान मध्यप्रदेश अशा राज्यांतही त्यांची कामे सुरू आहेत. सामाजिक सांस्कृतीक कामांमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग असायचा. तसेच सढळ हस्ते आर्थिक मदत करीत असे. डोंबिवली जिमखाना वास्तूचे नूतनीकरण आणि शहरातील खेळाडूंना व्यासपीठ मिळावे, यासाठी म्हैसकर स्पोर्ट्स क्लबची संकल्पना त्यांनीच मांडली होती.