अतिमागास तालुक्यांचा विकास, सिंचन सुधारण्यावर भर आणि युवकांची कौशल्यवृध्दी
ठाणे जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांचा नववर्षाचा संकल्प
ठाणे : ग्रामीण भागातील युवकांची कौशल्यवृद्धी करणे, आदिवासी, कातकरी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि जलयुक्त शिवारच्या माध्यमातून सिंचन आणि शेतीमध्ये अमुलाग्र बदल करणे असा नवीन वर्षाचा संकल्प ठाणे जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी मंगळवारी व्यक्त केला. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सिद्धी २०१७ – संकल्प २०१८ निमित्त एका पत्रकार परिषदेचे आयेाजन करण्यात आलं होतं. गेल्या वर्षभरात शासनाच्या महत्वाच्या योजनांची जिल्ह्यात कशी अंमलबजावणी झाली त्याविषयीची माहितीही त्यांनी दिली.
जिल्ह्यात जलयुक्त शिवारच्या कामासंदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितले की, २०१५-१६ मध्ये २६ गावांत २८७८ तर २०१६-१७ मध्ये १८ जलयुक्त शिवाराची १३५३ कामे पूर्ण झालीत. २०१७-१८ साठी ४४ गावांची निवड आणि गावांचे आराखडे तयार करण्याचं काम सुरू आहे. जलयुक्त मुळे जिल्ह्यात ७०६५ हेक्टर सिंचन क्षमता वाढलीय. जलयुक्त शिवारसाठी विशेष निधीतून गेल्या वर्षी १० कोटी रुपये उपलब्ध करून दिले होते. यंदाच्या वर्षी १५ कोटी उपलब्ध करण्यात आलय. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत एकूण २१ हजार ३६५ लाभार्थीपैकी १६ हजार ४८६ लाभार्थींच्या खात्यात ५० कोटी १६ लाख रुपये जमा झाले आहेत. उर्वरित सुमारे ५ हजार लाभार्थींना २४ कोटींची रक्कम देण्याची प्रक्रिया सुरु आहे. गेल्या वर्षी राष्ट्रीयकृत बँकांनी १३५ कोटी रुपये असे समाधानकारक पिक कर्ज वाटप केले होते. यंदा आजमितीस सुमारे १०० कोटी पिक कर्ज वाटप खरीपात तर सुमारे ६ कोटी रब्बी हंगामासाठी कर्ज वाटप झाले आहे. खरीपासाठी १५५ कोटीचे तर रब्बीसाठी ४९ कोटी ६५ लाखाचे उद्दिष्ट्य असल्याचं जिल्हाधिका-यांनी सांगितलं. जिल्ह्यात ४ हजार ८०० हेक्टरवर भाजीपाला लागवड करण्यात आली असून, वर्षभरात १० हजार हेक्टरचे उद्दिष्ट्य आहे. शेतकरी आठवडा बाजारांमध्ये शेतकरी गटांमार्फत आत्तापर्यंत ५ हजार १५६ मेट्रीक टन फळे व भाजीपाल्यांची मालाची विक्री झाल्याचे त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी जिल्ह्यातील छोट्या पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी माळशेज, गोरखगड, सिंगापूर, कुंडल अशा स्थळांना ७.५ कोटी रूपये देण्यात आले होते. यंदा देखील ७.५ कोटी उपलब्ध करण्यात आलेत. तर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत गेल्या वर्षी २६ कोटी तर यंदा ३२ कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत असेही जिल्हाधिका-यांनी स्पष्ट करीत शासनाच्या विविध कामांचा आढावा सादर केला.
हागणदारी मुक्तीत राज्यात पाच क्रमांक
हागणदारी मुक्तीमध्ये ठाणे जिल्हा हा देशात ९ व्या तर राज्यात ५ व्या क्रमांकावर आहे. २०१२ च्या पायाभुत सर्वेक्षणानुसार शौचालय नसलेली ९१ हजार २२५ एवढी कुटूंब होती त्यानुसार २०१६-१७ पर्यंत ९१ हजार २२५ एवढी शौचालय बांधून पूर्ण करण्यात आलीत. एकुण ४३० ग्रामपंचायती हागणदारी मुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले असुन त्यानुसार ग्रामीण ठाणे जिल्हा 100%हागणदारी मुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले आहे.
दीड लाख दुर्मिळ ग्रंथाचे डिजीटायझेशन
ठाणे जिल्ह्याचे वैभव असलेल्या व 123 वर्षाची पंरपरा असलेल्या मराठी ग्रंथ संग्रहालयात असलेल्या सुमारे १ लाख ५५ हजार साहित्य संपदेचे /दुर्मिळ ग्रंथाचे डिजीटायझेशन करण्याचे काम सुरू आहे त्यासाठी २.३४ कोटी रूपये निधी मंजूर करण्यात आला असून आतापर्यंत ५० लक्ष इतका निधी उपलब्ध करून देण्यात आलाय.