भीमा कोरेगाव येथे आंबेडकरी जनतेवर दगडफेक, वाहनांची तोडफोड : पोलिसांनी केली संचारबंदी लागू
पुणे : भीमा कोरेगाव येथील शौर्य स्तंभास अभिवादन करण्यासाठी राज्याच्या विविध कानाकोप-यातून आलेल्या आंबेडकरी जनतेवर काही समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आली. यामध्ये आंबेडकरी समाजातील महिला व पुरूष कार्यकर्ते जखमी झाले आहेत. 40 हून अधिक कार, गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. पुणे जिल्हयातील सणसवाडी परिसरात हा प्रकार घडला. या घटनेमुळे या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण असून पोलिसांनी संचारबंदी लागू केलीय.
दरवर्षी १ जानेवारीला भीमा कोरेगाव येथे आंबेडकरी जनता बसेस व खाजगी वाहने करून मोठया संख्येने जमते. यंदा शौर्य स्तंभाचे २०० वे वर्षे असल्याने यंदाही आंबेडकरी जनता मोठया संख्येने जमले होते. काही समाजकंटकांकडून अचानक दगडफेक करण्यात आली. तसेच वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. अचानक झालेल्या दगडफेकीमुळे लहान मुले व महिलांमध्ये गोंधळ उडाला होता. वातावरण तणावपूर्ण झाले होते. पोलिसांनी घटना स्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यांच्या मदतीला सीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. भीमा कोरेगांव, वढू बुद्रुक, शिक्रापूर या गावांमध्ये पोलिसांनी संचारबंदी लागू केलीय. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.आंबेडकरी जनतेने अफवांवर विश्वास न ठेवता शांत राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेय.
हल्लेखोरांना अटक करा : रामदास आठवले
भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जमलेल्या आंबडेकरी जनतेवर केलेला भ्याड हल्ल्याचा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी तीव्र निषेध केलाय.या हल्ल्याची सखोल चौकशी करून हल्लेखोरांना त्वरीत अटक करण्यात यावी अशी मागणी आठवले यांनी केलीय. तसेच शांतता राखण्याचे आवाहनही त्यांनी केलय.