कमला मिल्समध्ये ९६ पेक्षा अधिक रेस्टॉरंटस : फायर ऑडीटचे नियम धाब्यावर
काँग्रेसची न्यायालयीन चौकशीची मागणी
मुंबई : कमला मिल्स कंपाऊंडमध्ये ९६ पेक्षा अधिक रेस्टॉरंट असून, बहुतांशी अनधिकृतपणे थाटण्यात आली आहेत तसेच पब्सचे कोणतेही फायर ऑडीट झालेले नसून सगळे नियम धाब्यावर बसवलेत आहेत त्यामुळे या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी केलीय.
कमला मिल्स येथील ‘वन अबव्ह’ आणि ‘मोजोज’ या पब्सला गुरूवारी रात्री भीषण आग लागली. यामध्ये आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झालाय तर १२ जणांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. ज्या वन अबव्ह आणि मोजोज पब्स मध्ये ही आग लागली तेथील निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला, त्या पब्सचे कोणत्याही प्रकारचे फायर ऑडिट झालेले नव्हते. हे पब्स चालवताना फायर सेफ्टीचे सगळे नियम धाब्यावर बसवले गेले होते तसेच या पबमध्ये जाण्या-येण्यासाठी एकच मार्ग आहे जो अतिशय लहान आहे. इथली रेस्टॉरंट अनधिकृतपणे बांधण्यात आलेली आहेत आणि राजरोसपणे सुरु आहेत. एवढ्या छोट्या कंपाउंडमध्ये एवढी रेस्टॉरंट्स कशी काय सुरु आहेत ? त्यांना परवानगी कशी मिळाली ? या सगळयांची चौकशी होणे गरजेचे आहे असे निरूपम यांचे म्हणणे आहे.
परवानगी देण्यात नागरपूरच्या आमदारांचा हात ?
मुंबई महापालिका अधिकारी आणि राजकीय नेते यांच्या दबावाशिवाय इथल्या परवानगी दिल्या जाऊ शकत नाही. अलीकडच्या काळात शिवसेनेचे युवा नेते सुद्धा तिकडे येऊन गेलेले होते. पबच्या मालकाशी त्यांचे काही साटेलोटे आहे का ? याचीही चौकशी व्हायला हवी. तसेच या पब्सना परवानगी मिळण्यामागे भाजपच्या नागपूरच्या आमदारांचा हात असल्याची माहिती आहे त्यामुळे ज्याने या पब्स ना परवानगी देण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांवर दबाव टाकला. त्या आमदाराची देखील चौकशी होणे गरजेचे आहे असेही निरूपम यांनी सांगितलं.