नववर्ष कार्यक्रमांत आगीची दुर्घटना घडू नये यासाठी ठाणे जिल्हाधिका-यांच्या सतर्कतेच्या सुचना
कार्यक्रमांना परवानगीपूर्वी अग्निसुरक्षेची खातरजमा करण्याचे निर्देश
ठाणे : लोअर परेल भागातील कमला मिल कंपाउंडमधील इमारतीच्या टेरेसवरील पबला आग लागुन झालेल्या दुर्देवी दुर्घटनेत 14 व्यक्तींचा मृत्यु झाल्याच्या पार्श्वभुमीवर अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठाणे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी सर्वच यंत्रणांना सतर्कतेच्या सुचना दिल्या आहेत. तसेच कार्यक्रमांना परवानगीपूर्वी अग्निसुरक्षेची खातरजमा करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.
ठाणे जिल्हयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष म्हणुन ठाणे जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्य उत्पादन शुल्क विभाग, महापालिकेतील अग्निशमन अधिकारी, पोलीस यंत्रणा व ठाणे शहरातील मॉल व रिसॉर्टधारक यांची तातडीने बैठक बोलावून संबधित अधिका- यांना सर्तकतेच्या सुचना दिल्या. ठाणे जिल्हा हा मुंबई शहरालगत असून येथील शहरात मोठया प्रमाणात नववर्ष स्वागतासाठी समारंभाचे आयोजन केले जाते. त्यामुळे अशा दुर्देवी दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग, अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्रतिनिधी, पोलीस विभाग व महापालिका व त्यांच्या अंतर्गत असणारे अग्निशमन विभागांनी पथके तयार करून सर्वसामान्य जनतेचे प्रबोधन करून आवश्यक त्या सर्व खबरदारी घेणेबाबत सर्व संबंधितांना अवगत करावे असेही सांगण्यात आले.
आपत्ती व्यवस्थापन कायदयांतर्गत परवानगी घेणे आवश्यक
या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती वंदना सूर्यवंशी यांनी ठाणे महापालिका मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांनी एक दिवसाच्या कार्यक्रमासाठी परवानगी देण्याची तरतुद असून जेथे जेथे बंदीस्त क्षेत्रात,आगीच्या संबंधासह कार्यक्रम करणार असतील अशा सर्व ठिकाणीआपत्ती व्यवस्थापन कायदयांतर्गत परवानगी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.
अग्निशमन परवाना आवश्यक
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे व संबंधित पोलीस विभागांकडे आलेले परवानगी अर्ज त्यांनी संबंधीत महापालिकांकडे पाठवावे व त्यांनी सदर ठिकाणांची पाहणी करून आपत्ती व्यवस्थापन कायदयाच्या कलम 33खाली संबंधितांना नोटीसा काढुन अशा कार्यक्रमाकरीता अग्निशमन परवाना आवश्यक असल्याचे निदर्शनास आणुन दयावे असेही त्यांनी सांगितले.
एक खिडकी यंत्रणा सुरू करावी
नववर्ष कार्यक्रमांच्या परवानांसाठी मोठया प्रमाणात अर्ज येणार आहेत ही बाब विचारात घेऊन सर्व सामान्य जनतेला त्रास होणार नाही यादृष्टीने एक खिडकी यंत्रणा सुरू करून सर्व आवश्यक ते निकष तपासुन त्वरीत परवानग्या अदा करण्यात याव्यात याबाबतची सर्वस्वी जबाबदारी कार्यान्वयीन यंत्रणा म्हणुन संबंधीत अग्निशमन दल / संबंधीत उपायुक्त,उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांची राहील अशा सुचना देण्यात आल्या. ग्रामीण भागातील जनतेने कोठे परवानगी घ्यावी याबाबत चर्चा झाली असता, राज्य शासनाची http://www.mahafireservice.gov.in असे संकेतस्थळ असून हयावर ऑनलाईन अर्ज करून परवानगी मिळविण्याची सुलभ सुविधा असल्याचे सांगण्यात आले.