आई, तुझ्यासाठी काही पण…

देवाने या जगाची निर्मिती करताना बनवलेली दोन निर्मळ नाती म्हणजे मातृत्वाचे व मित्रत्वाचे. या दोन्हींचा सुंदर मिलाप म्हणजे ‘आई. आई या शब्दातच एवढं प्रेम सामावलं आहे की न सांगता, न भासता आपल्यात व आपल्या जवळच असते. एखाद्या सावली सारखीच. आई एक असा आरसा आहे, ज्यात न सांगता, न बोलता सर्व काही तिला कळतं. आपलं दुखणं, आपलं रडणं, आपले आनंद आणि अर्थातच आपलं भविष्य हे तिलाच कळतं आणि तिच वळवते. सध्याच्या जमान्यातलं आई आणि मुलांचं नातं हे रेश्माच्या धाग्यासारखं आहे. ज्यात फक्त मऊपणा आणि कोमलताच जपलेली आणि लपलेली आहे. प्रत्येकाचं भावविश्व जिच्या आजुबाजूला फिरतं अशा आईबद्दल, तिच्या मायेबद्दल बोलावं तितकं कमीच आहे. अशाचा एका आईबद्दलची ही कहाणी.

डोंबिवली पश्चिमेत राहणा-या सुमन एकनाथ बावस्कर या बावस्कर आई म्हणून सगळयांच्याच परिचयाच्या. प्रत्येकाच्या सुख दु:खात, अडीअडचणीच्यावेळी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हीच त्यांची ओळख. प्रदीप आणि संतोष ही त्यांची दोन्ही मुले दरवर्षी २ ऑक्टोबर आईचा वाढदिवस मोठया धुमधडाक्यात साजरा करतात. प्रदीप बावस्कर हे डोंबिवलीतील नामवंत वकिल आहेत. माझा मुलगा वकिल झाला आणि आमची परिस्थिती सुधारली. दोन्ही मुलांचे कौतूक करताना त्या भारावून जातात तर जुने दिवस आठवले की आजही त्यांच्या डोळयातून अश्रू तरळतात. बावस्कर आईंच्या जीवनात अनेक संकटे आली. पण त्या संकटांना सामोरे जात त्यावर त्यांनी खंबीरपणे मात केली. पती आजारी पडले, त्यांची पोलीस खात्यातील नोकरी सुटली. त्यात कौटूंबिक मनस्तापाला सामोरे जावे लागले. आणि पाच मुलांचा सांभाळ..तुटपुंज्या पेन्शनवर कुटूंब चालवणे हे जिकरीचे जायचे. मग टिकल्या बनवणे, पापड लाटणे अशी कामे घरी आणून त्या करायच्या. आईच्या कामात मुलेही हातभार लावीत. १९९८ ला मुंबईहून डोंबिवलीत आल्या. हातात काहीच पैसे नव्हते. मैत्रिणीकडून पाचशे रूपये घेऊन त्यांनी डोंबिवली गाठली आणि एका छोटयाशा खोलीत आपला संसार थाटला. आपल्या वाटेला जे दुःख आले ते आपल्या मुलाच्या वाटेला येऊ नये ही कुठल्याही आईची आंतरीक कळकळ असते तशी बावस्कर आईची होती. मुलांचे जीवन आनंददायी बनवायचे असेल तर अपेक्षित ज्ञान आणि परिस्थितीचे भान असणे गरजेचे आहे आणि हे शिक्षणाविना लाभणे कठीण आहे. अशा परिस्थिीतीत त्यांनी मुलांचे शिक्षण केलं. त्यांचा एक मुलगा वकिल झाला. वकिल झाल्यानंतर मुलाला अंगात घालायला सफेद शर्ट आणि कोट नव्हता. अशावेळी स्थानिक नगरसेवक प्रकाश म्हात्रे, मधुकर भोईर आणि सुनील म्हात्रे यांनी मदत केली. ते दिवस आजही त्यांना आठवतात. गरीबी काय असते हे आम्ही जवळून अनुभवली आहे.  गरीबांची कामे विना पैशाने करा अशी आईची शिकवण आणि ती कामे मी विना पैशाने करतो.  कोणाचं वाईट चिंतू नये, सर्वांना मदत करावी हे संस्कार तिने आमच्यावर केले. संकटे आले तरी मागे हटायचे नाही. संघर्षातून मार्ग काढायचा या तिच्या शिकवणीमुळे जीवनात कधीच मागे वळून पाहिले नाही असे अॅड प्रदीप बावस्कर सांगतात. आज मी जे काही आहे. माझया आईमुळेच आहे. ती आमच्या सुख दु:खात सहभागी होते, आम्हाला प्रोत्साहन देते. तिचा संघर्ष आम्ही लहानपणापासून पाहात आलोय.  त्यामुळे आमची आई ही सुपर वुमन आहेच, पण बेस्ट फ्रेंड सुध्दा आहे असेही अॅड प्रदीप बावस्कर आईविषयी बोलताना सांगतात. मैत्री कल्याणकारी संस्थेच्या माध्यमातून आदिवासीच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी खूप काम केलंय. सामाजिक कामातही त्यांचा पुढाकार राहिलाय. सध्या वयोमानामुळे आणि आजारपणामुळे कुठं जाण होत नाही. मात्र योगा- जीम करण्याची त्यांची आवड या वयातही कायम आहे. आईच्या प्रेमाला, मायेला कशाचीच उपमा नाही. म्हणून तर म्हणतात ना ‘स्वामी तिन्ही जागाचा आईविना भिकारी’. बावस्कर आईंना ६८ व्या वाढिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वराचरणी प्रार्थना.
शब्दांकन : संतोष गायकवाड

 

 

 

One thought on “आई, तुझ्यासाठी काही पण…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!