फेरीवाल्यांवर कारवाई न केल्यास न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका दाखल करू :
राज ठाकरेंचा पोलिसांना अल्टीमेटम
डोंबिवली : रेल्वे स्टेशन परिसर, शाळा-महाविद्यालय, रुग्णालये परिसर आदी वर्दळीच्या ठिकाणी यापुढे अनधिकृत फेरीवाले दिसल्यास संबंधित पोलीस अधिकारी यांच्यावर कोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्याबद्दल केस दाखल का करू नये, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पत्र आज डोंबिवलीतील मनसेच्या शिष्टमंडळाने विष्णुनगर, रामनगर, टिळकनगर आणि मानपाडा पोलिस स्टेशनला दिले. यापूर्वीही मनसेने महापालिका आणि रेल्वेला पत्र दिलं असतानाच आता स्थानिक पोलिसांनाही अल्टीमेटम दिलाय. त्यामुळे पोलीस चांगलेच कैचीत अडकले असून, यापुढे ते काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष वेधलंय.
न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वे स्टेशन परिसरात दीडशे मीटर परिसरात बसण्यास मनाई आहे त्यासाठी महापालिकेने पट्टीही आखली आहे पण फेरीवाले नियमांचे उल्लंघन करीत आहेत. त्यामुळं पोलिसांनी नियमांचं उल्लंघन करणा-या फेरीवाल्यांवर फौजफारी आणि कायदेशीर कारवाई करत न्यायालयाचे आदेश पाळावेत, अशी मागणी मनसेनं केली. तसेच पोलिसांनी दीडशे मीटर परिसरातल्या फेरीवाल्यांवर कारवाई केली नाही, तर पोलिसांविरोधातही न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका दाखल करू असा इशाराच मनसेने दिलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्राची प्रत मनसेने स्थानिक पोलीस ठाण्यातील वरिष्ठांना दिली. यावेळी मनसेच्या शिष्टमंडळात मनसे डोंबिवली शहरअध्यक्ष मनोज प्रकाश घरत, जिल्हाअध्यक्ष प्रकाश भोईर, जिल्हा अध्यक्षा .दिपीका पेडणेकर, जिल्हा सचिव प्रकाश माने, जिल्हा संघटक राहुल कामत, उपजिल्हाअध्यक्ष सुदेश चुडनाईक, शहरअध्यक्षा .मंदा पाटील, शहर संघटक मनोज राजे, शहरसचिव सुभाष कदम, उपशहर अध्यक्ष दिपक शिंदे, विभाग अध्यक्ष श्रीकांत वारंगे, रमेश यादव, विजय शिंदे आदी उपस्थित होते.