एका अवलिया रिक्षाचालकाचे विनोदी नाटक लवकरच रंगभूमीवर
घाटकोपर (निलेश मोरे) : अंगी कला असली, की मग ती कला व्यक्तीला स्वस्थ बसू देत नाही.जातिवंत कलाकार कोणत्याही साधनेतून कला सिद्ध करून दाखवतोच मग त्याला कितीही अडचणी असल्या तरीसुध्दा ती कला उभी करतोच ! असच एक उदाहरण ठरलंय रिक्षाचालक असणारे गोरख माने ! अनेक वर्षांपासून मराठी रंगभूमीवर सामाजिक विनोदी नाटक साकारण्याची त्यांच्या मनात असलेली जिद्द अखेर पूर्णत्वास येत आहे. ‘साठीने मारली मिठी’ हे त्यांचं दोन अंकी मराठी विनोदी नाटक नववर्षात अखेर रंगभूमीवर येत आहे .
घाटकोपर पश्चिमेतील भटवाडी काजूपाडा येथे 10 बाय 15 च्या खोलीत माने कुटुंबीय राहतात. प्रसिद्धीचा कोणताही हव्यास न ठेवता त्यापासून अलिप्त राहत रिक्षाचालक गोरख शिवाजी माने याने नवोदित कलाकारांना वाव देण्यासाठी स्वत: निर्मिती क्षेत्रात शिरकाव केला. रिक्षा चालवून दिवस भरात मिळणाऱ्या उत्पन्नातुन त्यांनी विनोदी नाटकाची निर्मिती केलीय. अवघे नववी पर्यंत शिक्षण झालेल्या माने याना शाळेपासूनच नाट्य कलेची आवड आहे. आर के सावंत यांच्याकडून त्यांनी नृत्याचेही शिक्षण घेतले. माया जाधव यांची ऑफर स्वीकारून कुणाल म्युझिक कंपनी अंतर्गत रेतीवाला नवरा पाहिजे या गाण्यासाठी नृत्याचे दिगदर्शन केले . हे गाणे महाराष्ट्रात हिट देखील झाले . त्यानंतर आग्री कोळ्यांची सावली , कायदा भीमाचा , खैरलांजी हत्याकांड , सर्गणी मोबाईल केलं या गाण्यावर नृत्य दिग्दर्शन केले आहे. नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळावं आणि त्यांच्या कलेला उत्तेजन मिळावं यासाठी गोरख माने यांनी स्वत:चे रसिक रंजनी ही नाट्य , नृत्य संस्था सुरू केली आहे . व्यावसायिक नाटक चालवून कलाकारांना त्यांचं मानधन वेळेवर मिळावं यासाठी अनेकदा माने यांनी कर्ज काढले आहे . रिक्षाच्या उत्पनातून थोडे थोडे पैसे बाजूला करून माने कर्ज फेडत आहेत
तरुणांचा देश म्हणवणाऱ्या या आपल्या देशात वयोवृद्धांच्या सध्याच्या अवस्थेवर विनोदी कलेतून भाष्य करत सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी साठीने मारली मिठी या नाटकातून केला आहे . महाराष्ट्र हे कला संस्कृतीच नंदनवन आहे . मात्र आज कलाकारांची अवस्था खूप बिकट आहे . स्पर्धेच्या जगात प्रत्येकाला संधी मिळणे कठीण झाले आहे . आज सोशल मीडिया द्वारे शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून अनेक कलाकार आपली आगळी वेगळी कला आजमावण्याचा प्रयत्न करताना दिसतात . कलाकारांची कला जीवंत राहावी हाच माझा हेतू असल्याचे माने सांगतात. गेल्या 12 वर्षांपासून ते या क्षेत्रात धडपड करत आहे . दिवसभर रिक्षा चालवून त्यांना 900 रुपये मिळतात यातील प्रत्येकी 300 रुपये त्यांनी संस्थेच्या अकाउंटवर कलाकारांचा निधी म्हणून जमा केला. हे सांगताना ते भावूक होतात . स्वत:ची कला जीवंत ठेवत इतरांना देखील त्या प्रवाहात आणून गोरख माने खऱ्या खुऱ्या आयुष्यात एक उत्तम कलाकार ठरलेत. लेखक , नृत्य दिग्दर्शक ते निर्माता अशी भरारी घेणाऱ्या अवलिया रिक्षाचालकाला सिटीझन जर्नालिस्ट चा सलामच.
Great kalakar