राज्यस्तरीय युवा महोत्सवासाठी संदेश विद्यालयाची निवड
घाटकोपर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य व उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, मुंबई विभाग यांच्या वतीने संपन्न झालेल्या मुंबई विभागस्तरीय युवा महोत्सवात मुंबई उपनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेच्या पार्क साईट, विक्रोळी(पश्चिम) येथील संदेश विद्यालय अँड ज्युनि. कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स अँड सायन्सच्या विद्यार्थ्यांनी समूह लोकगीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक, हार्मोनियम वादन स्पर्धेत आदित्य खवणेकर याने प्रथम क्रमांक, वक्तृत्व स्पर्धेत अश्विनी घन हिने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच संस्थेच्या हार्दिक संगीत विद्यालयाच्या ऋषिकेश शिंदे यांनी मृदूंग वादन व सुयश संगीत विद्यालयाच्या भूषण मोकल यांनी तबला वादन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावले. प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांची गारखेडा, औरंगाबाद येथे होणाऱ्या राज्यस्तरीय युवा महोत्सवासाठी निवड झाली आहे. सुयशप्राप्त विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे संगीत शिक्षक मनोहर म्हात्रे यांचे संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे आणि शाळेचे प्राचार्य राजेंद्र म्हात्रे यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.